सोलापुरातील माळशिरसमध्ये तृतीयपंथीयाला मिळालं सरपंचपद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 03:09 PM2017-10-17T15:09:17+5:302017-10-17T16:00:29+5:30
सोलापूर - दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत ऐतिहासिक निर्णय झाला आहे. माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावात चक्क तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झाला आहे. तृतीयपंथी सरपंच होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची मतमोजणी आज सुरु आहे. यात तरंगफळ गावातील गावकऱ्यांनी भाजपा पुरस्कृत तृतीयपंथी ज्ञानेश्वर कांबळे यांना निवडून दिलं. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सुमारे 4 हजार ग्रामपंचायतीसाठी 16 ऑक्टोबरला मतदान झालं होतं.
कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा मतांनी पराभव करुण विजय मिळवत राज्यात पहील्यांदा थेट सरपंच होण्याचा मान मिळवला आहे . कांबळे यांच्या या विजयामुळे तरंगफळ ग्रामस्थांनी मिरवणुक काढण्यात आली होती .
तरंगफळ थेट सरपंच पद अ.जाती साठी राखीव आहे त्यात दिपक कांबळे १७ , पांडुरंग कांबळे ३६ , रामहारी कांबळे १९ सागर कांबळे २१ ज्ञानु कांबळे ८३४ मते विजयी , फत्तेसिंग वाघमारे १८ , जयसिंग साळवे ६६७ , नोटा ७ असे मतदान झाले यात सर्वाधीक मते मिळाल्याने तृतीयपंथी ज्ञानेश्वर कांबळे यांना विजयी घोषीत करण्यात आले .
समाजाचा दृष्टीकोन बदलून नवा पायंडा पाडला
तृतीयपंथी व्यक्तींना समाजात मान मिळत नाही . त्यांचकडे समाज वेगळया दृष्टीने पाहतो . त्यांना मुख्य प्रवाहापासुन दुर लोटले जाते . देव व अशा धार्मीक गोष्टीत अडकलेले असतात मात्र ज्ञानेश्वर कांबळे यांनी एक नवा पायंडा पाडला व गावाला विकासाची वेगळी दिशा देण्यासाठी निवडणूक लढवत गावकऱ्यांचा विश्वास संपादन करून भाजपाच्या पाठींबा घेत निवडणूक लढवून थेट सरंपच पदासाठी विजयी झाल्या .