पुण्यात पहिले स्वतंत्र '' सायबर सिक्युरिटी '' कॉलेज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 11:22 AM2019-12-03T11:22:36+5:302019-12-03T11:28:13+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात पहिले ‘सायबर सिक्युरिटी’ कॉलेज सुरू होणार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात पहिले ‘सायबर सिक्युरिटी’ कॉलेज सुरू होणार असून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने या प्रस्तावास मान्यता दिली आहे. तसेच सायबर सिक्युरिटीसह इतर १३ नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव विद्यापीठाने अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविले आहेत. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांच्या संख्येत १३ नव्या महाविद्यालयांची भर पडणार आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत नवीन महाविद्यालयाच्या प्रस्तावावर चर्चा केली. विद्यापीठाच्या पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यामध्ये नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी बृहत् आराखड्यानुसार प्रस्ताव मागविले होते. प्राप्त प्रस्तावांची विद्यापीठातर्फे छाननी केली. त्यानंतर प्रस्तावावर चर्चा करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला.
पुणे जिल्ह्यात ९ प्रस्ताव, नाशिक जिल्ह्यात ३ तर इतर १ अशी १३ महाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाने मंजूर केला आहे. विद्यापीठाकडे पुण्यातील ३ शैक्षणिक संस्थांनी ‘सायबर सिक्युरिटी’बाबत प्रस्ताव पाठविले. त्यातील २ शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविले आहेत.