३६५ दिवस भरणारी जिल्ह्यातील पहिली आयएसओ मानांकित शाळा
By admin | Published: November 3, 2015 09:43 PM2015-11-03T21:43:28+5:302015-11-04T00:08:27+5:30
सर्व सदस्यांनी आदर्श शाळा करण्यापेक्षा शाळेला आयएसओ मानांकन मिळवण्याचे ध्येय ठेवूया, असा एकमुखाने निर्धार केला, यादृष्टीने लगेचच तयारी सुरु केली.
संकेत गोयथळे - गुहागर--रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या आयएसओ शाळेचा बहुमान गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद डिजिटल शाळा अंजनवेल नं. २ (कातळवाडी)ने पटकावला आहे. ४ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्या हस्ते आयएसओ मानांकन प्रदान सोहळा होणार आहे. वर्षाचे ३६५ दिवस भरणाऱ्या या शाळेला हे मानांकन मिळत आहे.अंजनवेल गावच्या एका बाजूला कातळवाडी येथे असणाऱ्या या शाळेमधील मुख्याध्यापक अवधूत राऊतराव, शिक्षिका सुलक्षणा करडे व व्यवस्थान समितीने जुलै २0१५ मध्ये पहिली सभा घेताना आदर्श शाळा करण्याबाबत चर्चा केली. यामधून अंजनवेल सरपंच यशवंत बाईत, व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश गुळेकर, रंजना बने, शिक्षक - पालक संघ उपाध्यक्ष मानसी गुळेकर व सर्व सदस्यांनी आदर्श शाळा करण्यापेक्षा शाळेला आयएसओ मानांकन मिळवण्याचे ध्येय ठेवूया, असा एकमुखाने निर्धार केला, यादृष्टीने लगेचच तयारी सुरु केली. संपूर्ण वाडीला विश्वासात घेतले व आॅगस्ट २०१५ला आयएसओसाठी रजिस्ट्रेशन केले. माजी मुख्याध्यापक यशवंत धनवटे यांनीही सहभाग घेतला.
यानंतर पहिल्यांदा आयएसओ कमिटी सदस्यांनी भेट दिली तेव्हा ७० टक्के पूर्तता होती. उर्वरित त्रुटी दूर कशा कराव्यात, याबाबत मार्गदर्शन मिळाल्यानंतर उत्साह द्वीगुणित झाला व २३ आॅक्टोबरला आयएसओ मानांकन जाहीर झाले. याबाबत माहिती देताना मुख्याध्यापक अवधूत राऊतराव यांनी सांगितले की, या शाळेमध्ये ३८ विद्यार्थी आहेत. यासाठी आम्ही दोन शिक्षक कार्यरत आहोत. वर्ग ही संकल्पना बाजूला ठेवून भाषेची वेगळी प्रयोगशाळा व कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, परिसर अभ्यास याची वेगळी प्रयोगशाळा केली. भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांनी स्वेच्छेने घरपट २०० रुपये जमा केले. वाडीमध्ये ३००हून अधिक कुटुंब आहेत. ग्रामपंचायतीनेही यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. शाळा डिजिटल करण्यासाठी एक साधा व एक अन्ड्रॉईड असे दोन एलईडी संच, शाळा इमारती परिसरात लादी व रंगरंगोटी, विद्यार्थ्यांना गणवेश, कारंजा, दोन संगणक संच आदी सर्व सुविधा पुरवण्यात आल्या. प्रवेशद्वाराजवळील बांधावर वाहतुकीचे नियम, रंगमंचावर आकाशगंगा, सूर्यमाला, पर्यावरण जागृतीचे विविध संदेश देण्यात आले आहेत. मैदानात खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल आदी मैदानी खेळाची सुविधा आहे. शिक्षिका सुलक्षणा करडे-राशीनकर या कराटे ब्लॅक बेल्ट असल्याने विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षण देतात. बोरभाटले येथील ग्रामस्थ गणेश दसबूड यांनी शाळेला टॅब दिला आहे. ही शाळा ३६५ दिवस भरते. सुटीच्या दिवशी मुले शाळेत येऊन शैक्षणिक चित्रपट, शिवाजी महाराज तसेच थोर संतांचा इतिहास पाहतात. शैक्षणिक सॉफ्टवेअरच्या सहाय्याने अभ्यासक्रमाचा सराव करतात.
शाळेत लंच विथ हेडमास्तर अशी नवी संकल्पना सुरु करण्यात आली आहे. दुपारच्या जेवणावेळी मुख्याध्यापकांसोबत एका विद्यार्थ्याला जेवणाची संधी देऊन शिक्षक-विद्यार्थी संवाद वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
- अवधूत राऊतराव, मुख्याध्यापक, अंजनवेल शाळा
ग्रामपंचायतीचा यात मोठा सहभाग असला तरी ग्रामपंचायत ही ग्रामस्थांची आहे. माजी विद्यार्थी मुंबई व पुणे येथील मूळ अंजनवेलवासीय उद्योजक व ग्रामस्थांनी संघभावनेने केले. अनेकवेळा श्रमदान केले. या सर्व चिकाटीमुळेच आमच्या अंजनवेल-कातळवाडी शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले.
- यशवंत बाईत, सरपंच, अंजनवेल
नियमित शिक्षणाबरोबर येथील विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण सुरु केले. मी स्वत: ब्लॅक बेल्ट असल्याने ते शक्य झाले व सार्थकी लागले, याचे खरे समाधान मिळाले. यामधून शाळेची गोडी तर वाढलीच, पण विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती व आत्मविश्वास वाढला.
- सुलक्षणा करडे-राशीनकर, शिक्षिका