भाजपाची पहिली यादी 16 मार्चला जाहीर होणार, अनेकांचे तिकीट कापणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 05:35 PM2019-03-14T17:35:11+5:302019-03-14T17:35:37+5:30
आघाडी आणि युतीचे समीकरण जुळल्यानंतर आता राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई - आघाडी आणि युतीचे समीकरण जुळल्यानंतर आता राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी 16 मार्च रोजी जाही होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत 17 ते 18 उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता असून, 2014 साली निवडून आलेल्या उमेदवारांपैकी पाच ते सहा जणांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेसोबतची युती निश्चित झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आपल्याकडील दोन जागा तडजोडीच्या स्वरूपात सेनेला दिल्या होत्या. दरम्यान, काही ठिकाणी भाजपा खासदारांबाबत नाराजी असल्याने अशा मतदारसंघात उमेदवार बदलण्याची चर्चा सुरू आहे. सध्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपाची राज्यातील उमेदवारांची पहिली यादी 16 मार्च रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत 17 ते 18 उमेदवारांचा समावेश होण्याची शक्यता आहे. तसेच मित्रपक्षांनाही भाजपाच्या खात्यामधून 1 ते दोन जागा सोडल्या जाऊ शकतात. तसेच जनमताचा कानोसा घेत पाच ते सहा मतदारसंघात विद्यमान खासदारांचे तिकीट कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते.