शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध, 15 हजार लाभार्थ्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 03:30 PM2020-02-24T15:30:35+5:302020-02-24T15:44:28+5:30
शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातील 34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती एकत्र करण्यात आली होती.
मुंबई- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच ठाकरे सरकारनं शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात आलं आहे. एप्रिल महिन्याअखेर कर्जमाफीचा लाभ टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातील 34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती एकत्र करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीतल्या 68 गावांमधल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना एक विशिष्ट प्रमाणपत्र बहाल केलं जात आहे. जिल्हा स्तरावरून कर्जमाफी देण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत आज 24 हजार 723 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. त्या पुरवणी मागण्यांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेसाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागील आठवड्यात आकस्मिक निधीतून 10 हजार कोटींचं नियोजन करण्यात आलं होतं. अशा पद्धतीनं एकूण 25 हजार कोटी रुपयांची तरतूद कर्जमाफीसाठी केली असून, त्यावर आता 27 फेब्रुवारी आणि 2 मार्चला चर्चा होणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लगेच जाहीर करणार असल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात कर्जमाफी जाहीर केली होती. त्यातील पहिला टप्पा दोन लाखांच्या आत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी होता वीस ते पंचवीस हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा दुसरा टप्पा राहणार आहे. कर्जमाफी देताना गोंधळ होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली. pic.twitter.com/mhonnTa8Ox
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 24, 2020