पहिली नगरपालिका ‘पनवेल’च

By Admin | Published: March 12, 2016 02:23 AM2016-03-12T02:23:14+5:302016-03-12T02:23:14+5:30

राज्यातील पहिली नगरपालिका म्हणून १ मे १८५३ मध्ये स्थापन झालेल्या सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचा उल्लेख केला जातो. वास्तवात २५ आॅगस्ट १८५२ मध्ये स्थापन झालेली पनवेल हीच राज्यातील पहिली नगरपालिका आहे

The first municipality is Panvel | पहिली नगरपालिका ‘पनवेल’च

पहिली नगरपालिका ‘पनवेल’च

googlenewsNext

नामदेव मोरे, नवी मुंबई
राज्यातील पहिली नगरपालिका म्हणून १ मे १८५३ मध्ये स्थापन झालेल्या सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचा उल्लेख केला जातो. वास्तवात २५ आॅगस्ट १८५२ मध्ये स्थापन झालेली पनवेल हीच राज्यातील पहिली नगरपालिका आहे. परंतु ही माहिती राज्यात सर्वत्र पोहचविण्यास पालिकेला अपयश आल्याने सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमधून पनवेलऐवजी रहिमतपूरला हा बहुमान दिला जात आहे.
इंग्रज सरकारने शहरांमध्ये नागरी सोयी- सुविधा पुरविण्यासाठी १८५० मध्ये नगरपालिका कायदा अस्तित्वात आणला. यानंतर पनवेलमधील दक्ष नागरिकांनी हा कायदा लागू करण्याची मागणी केले. तेव्हाच्या सरकारने कमिशन नियुक्त करून २५ आॅगस्ट १८५२ मध्ये नगरपालिका कायदा लागू करण्याचे निश्चित करण्यात आले. १ सप्टेंबरपासून प्रत्यक्षात नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. याविषयीची स्पष्ट नोंद १५ जानेवारी १८५७ च्या सरकारी गॅझेटच्या पान क्रमांक १३६ वर करण्यात आली आहे. सरकारी जाहीरनाम्याद्वारे ५ जणांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीला तेव्हा मॅजिस्ट्रेट एक्स आॅफिशिओ प्रेसिडेंट असे संबोधले जात होते. १९१० मध्ये नगरपालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली व युसुफ नुर मोहम्मद मास्तर हे पहिले नगराध्यक्ष झाले. आज पनवेल नगरपालिकेने १६४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. परंतु हा इतिहास पनवेलच्या घराघरापर्यंत पोहचविण्यास नगरपालिकेला अपयश आले आहे.
नगरपालिकांची सुरवात पनवेलपासून झाली असली तरी पहिली नगरपालिका म्हणून राज्यभर सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचा उल्लेख केला जातो. सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमध्ये, संकेतस्थळ व इतर सर्व ठिकाणी रहिमतपूर हीच
पहिली नगरपालिका असे ठसविले जात आहे.
पनवेल हीच राज्यातील पहिली नगरपालिका आहे. २५ आॅगस्ट १८५२ मध्ये नगरपालिका कायदा लागू करण्याचे शासन नियुक्त समितीने ठरविले. १ सप्टेंबर १८५२ मध्ये प्रत्यक्षात नगरपालिकेचे कामकाज सुरू झाले. याविषयी स्पष्ट उल्लेख १५ जानेवारी १८५७ च्या सरकारी गॅझेटमध्ये करण्यात आला आहे.
रहिमतपूर नगरपालिकेच्या संकेतस्थळावरही तसा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु वास्तवात रहिमतपूरला १ मे १८५३ मध्ये नगरपालिका स्थापन झाली आहे. पनवेल नगरपालिका मात्र २५ सप्टेंबर १८५२ मध्ये स्थापन झाली आहे. याविषयी स्पष्ट उल्लेख शासकीय दस्तऐवजामध्ये करण्यात आला आहे. पनवेलचा बहुमान दुसरे शहर मिरवत असून त्याची कल्पनाच पनवेल नगरपालिका प्रशासनास नाही. राज्यातील सर्वात जुन्या नगरपालिकांमधील एक असाच उल्लेख केला जात आहे. यामुळे पनवेलमध्ये राहणाऱ्या नागरिकांनाही हे शहर म्हणून राज्यातील नगरपालिकांची सुरवात असल्याचे माहीतच नाही. पनवेलवासीयांनाच माहिती नसलेली गोष्ट राज्यात इतर शहरांमधील नागरिक व अभ्यासकांना कशी माहिती होणार? शासकीय यंत्रणांनी कधीच याविषयी योग्य माहिती पोहचविण्याचा प्रयत्न केला नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही रहिमतपूर हीच पहिली नगरपालिका असे विविध पुस्तकांतून वाचावे लागत आहे. पनवेलच पहिली नगरपालिका आहे हे राज्यभर बिंबविण्यासाठी आता नगरपालिकेसह, लोकप्रतिनिधी व या शहराचा अभिमान असणाऱ्या नागरिकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
>>>>>२५ आॅगस्ट १८५२ ची
पहिली शासकीय कमिटी
हरी पुरुषोत्तम बापट
रामचंद्र बाळकृष्ण कर्वे
भगवंतराव केशव शृंगारपुरे
कुडाप्पा (खंडाप्पा) मोरप्पा गुळवे
मुळजी पितांबर शेट
मुल्ला इस्माईल
हाजी मुल्ला गुलाम हुसेन
मामलेदार पनवेल
कस्टम सरकारकून

Web Title: The first municipality is Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.