पुण्यात भरणार शिक्षकांची पहिली 'राष्ट्रीय काँग्रेस'
By admin | Published: July 5, 2016 08:43 PM2016-07-05T20:43:18+5:302016-07-05T20:43:18+5:30
शैक्षणिक प्रश्नांवर उहापोह करण्यासाठी देशात पहिल्यांदाच नॅशनल टीचर्स काँग्रेस २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
मुंबई : शैक्षणिक प्रश्नांवर उहापोह करण्यासाठी देशात पहिल्यांदाच नॅशनल टीचर्स काँग्रेस २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
पुण्यातील कोथरूड येथील माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट (मिटसॉग)महाविद्यालयाच्या प्रांगणात ही परिषद पार पडेल, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. नंदकुमार निकम यांनी दिली. या परिषदेला देशातील विविध विभागांत शिकवणारे सुमारे ८ हजार शिक्षक येण्याची शक्यता निकम यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. निकम म्हणाले की, या परिषदेचे आयोजन महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), मनुष्यबळ विकास मंत्रालय, भारत सरकार, असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययु), भारतीय छात्र संसद
फाऊंडेशन, महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल फेडरेशन व विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणेचे युनेस्को अध्यासन, हॉर्वर्ड बिझनेस स्कूल क्लब आॅफ इंडिया या संस्थांच्या सहकार्यातून केले आहे. देशातील पदवी आणि पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमांचे ८ हजार शिक्षक यामध्ये सामील होणार आहेत.
शिक्षणाचा दर्जा वाढवणे, शिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण देणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अधिकाधिक आर्थिक तरतूद करणे, शिवाय तरतूदीप्रमाणे आर्थिक खर्च करणे अशा विविध विषयांवर सखोल चर्चा परिषदेत होईल. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे राष्ट्रीय परिषदेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी आहेत. तर डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भाटकर अशी तज्ज्ञ मंडळी अनुक्रमे चेअरमन आणि कार्याध्यक्षपदी विराजमान आहेत. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन शिक्षकांना मिळेल. तीन दिवसीय परिषदेत सात सत्रे पार पडणार आहेत. त्यामध्ये शैक्षणिक, अध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, कला, पत्रकारिता या क्षेत्रांतील व्यक्ती मार्गदर्शन करतील.
देशात उत्तम संशोधक, संवेदनशील, समाजाभिमुख, प्रगतीशील, दिशादर्शक, प्रेरणादायी आणि
तत्त्वनिष्ठ शिक्षकांची फळी निर्माण करण्याचे परिषदेचे उद्दीष्ट आहे.
.............................
टीचर टू टीचर कनेक्ट
परिषदेत ६०शिक्षकांचा गट तयार करून ह्यटीचर टू टीचर कनेक्ट हा उपक्रम राबविला जाईल. ज्यामध्ये एकाच विषयावर सर्व शिक्षक आपापली मते मांडतील. त्यानंतर संबंधित विषयाचे सार काढून उपस्थित प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी ५० वर्षांहून कमी वयोगटातील शिक्षकांनी या परिषदेत सामील होण्याची आवाहन आयोजकांनी केले आहे.
या विषयांवर होणार चर्चा
- भारतीय शिक्षण पद्धतीचा इतिहास, सद्यस्थिती आणि भवितव्य
- सध्याच्या शिक्षण पद्धतीत भारतीय मूल्यांचा समावेश आहे का?
- कॉर्पोरेट सीएसआर तसे शिक्षणासाठी टीएसआर
- आपण शिकवितो; ते शिकतात का?
- शिक्षणस्तर सुधारण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडतेय का?
- शिक्षक : मार्गदर्शक, प्रेरक, प्रोत्साहक आपण अवलोकन करतो का?
- शिक्षणावरील खर्च अल्प नाही का?
.....................
दिग्गज वक्त्यांची उपस्थिती
याशिवाय कार्यक्रमात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, केंद्रीय मंत्री
स्मृती इराणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे,
अभिनेता आमिर खान, सुपर ३०चे जनक आनंद कुमार असे दिग्गज वक्ते मार्गदर्शन
करणार आहेत.