अकरावी प्रवेशाचा पहिला टप्पा आजपासून सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 05:57 AM2020-08-01T05:57:34+5:302020-08-01T05:57:46+5:30
शिक्षण संचालनालयाकडून अर्जाचा पहिला भाग १ आॅगस्टपासून भरता येणार असल्याची माहिती नोंदणी सुरू करण्याच्या वेळेसच देण्यात आली. मात्र विभागीय उपसंचालक कार्यालयांकडून अद्याप याबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी प्रवेशासाठी प्रवेश अर्जाचा भाग १ आजपासून विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. शुक्रवारी रात्री ८ पर्यंत १ लाख ७८ हजार २६२ विद्यार्थ्यांनी मुंबई विभागातून नोंदणी केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली माहिती भरून प्रवेश अर्ज लॉक करायचा आहे. शिवाय अर्जात भरलेली माहिती ही विद्यार्थ्यांना तपासून, प्रमाणित करून घेता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी पालकांची किंवा शिक्षकांची मदत घेऊ शकणार आहेत. त्यामुळे आता अकरावी प्रवेशाचा पहिला टप्पा आजपासून सुरु होणार आहे
शिक्षण संचालनालयाकडून अर्जाचा पहिला भाग १ आॅगस्टपासून भरता येणार असल्याची माहिती नोंदणी सुरू करण्याच्या वेळेसच देण्यात आली. मात्र विभागीय उपसंचालक कार्यालयांकडून अद्याप याबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही.
काय आहे मोबाइल अॅप?
विद्यार्थ्यांना अर्ज करणे सुलभ व्हावे या उद्देशाने अॅप सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून सुविधा एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यावर १ आॅगस्टपासून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचा आसन क्रमांक टाकायचा आहे.राज्य माध्यमिक मंडळाकडे असलेला सर्व तपशील येईल. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.