पहिल्या टप्प्यात दूध, भाजीपाला बंद करणार
By admin | Published: May 14, 2017 04:53 AM2017-05-14T04:53:25+5:302017-05-14T04:53:25+5:30
१ जूनपासून जाहीर केलेल्या शेतकरी संपाच्या पहिल्या टप्प्यात दूध, भाजीपाला बंद करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणतांबा (जि.अहमदनगर) : १ जूनपासून जाहीर केलेल्या शेतकरी संपाच्या पहिल्या टप्प्यात दूध, भाजीपाला बंद करण्यात येणार आहे. शनिवारी पुणतांब्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
संपूर्ण राज्यात हे आंदोलन करण्यात येणार आहे. ३ एप्रिलला पुणतांबा (ता. राहाता) येथील विशेष ग्रामसभेत १ जूनच्या शेतकरी संपाचा निर्णय घेण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाचे लोण संपूर्ण राज्यात पसरले. शनिवारी येथील काशी विश्वेश्वर मंदिरात पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची बैठक धनंजय धोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
‘मी शेतकरी संपावर जाणार’ असे घोषवाक्य तयार करण्यात आले. शिर्डी-संगमनेर राज्यमार्गावर दूध, भाजीपाल्याच्या गाड्या अडवून सरकारला आंदोलनाची दखल घेण्यासाठी आक्रमक पद्धतीने भाग पाडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी एकाच दिवशी राज्यभरात शेतकऱ्यांनी कुटुंबासह रेल्वे रोको करण्याचेही ठरले.
बैठकीस माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. धनंजय धनवटे, शिर्डीचे विजय कोते, पंकज लोढा, चंद्रकांत तुरंगे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.
बैठकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.