पहिली पोस्टिंग महापालिकांमध्ये
By admin | Published: July 9, 2015 02:28 AM2015-07-09T02:28:43+5:302015-07-09T03:08:21+5:30
प्रशासकीय सेवेत नव्याने रुजू होणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना (आयएएस) पहिली पोस्टिंग आता महापालिकांमध्ये आयुक्त म्हणून देण्याचे धोरण सरकार आणत आहे. त्या दृष्टीने एक प्रस्ताव नगरविकास विभागाने
अतुल कुलकर्णी मुंबई
प्रशासकीय सेवेत नव्याने रुजू होणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना (आयएएस) पहिली पोस्टिंग आता महापालिकांमध्ये आयुक्त म्हणून देण्याचे धोरण सरकार आणत आहे. त्या दृष्टीने एक प्रस्ताव नगरविकास विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे. सध्या नव्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती दिली जाते.
२०१४-१५च्या आर्थिक पाहणी निष्कर्षानुसार राज्यात ५० टक्क्यांच्या पुढे नागरीकरण झाले आहे. ३६ जिल्ह्याच्या महाराष्ट्रात ३६ शहरांनी १ लाख लोकसंख्येच्या पुढे मजल मारली आहे. वाढत्या नागरीकरणाने शहरांचे प्रश्न बिकट बनू लागले आहेत. तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या आजूबाजूची गावे शहरात समाविष्ट होऊ लागली आहेत. त्यामुळे त्या त्या नगरपालिका, महापालिकांवरील बोजा वाढू लागला आहे. त्यामुळे येत्या काळात पालिकांच्या आयुक्तांवर मोठी जबाबदारी येणार आहे. सध्या असणाऱ्या आयुक्तांच्या कारभारावर मुख्य सचिव, नगरविकास विभाग आणि स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणावे तेवढे समाधानी नाहीत.
काही अधिकारी तर त्याच महापालिकेत अधिकारी ते आयुक्त पदापर्यंत गेले. ते दुसऱ्या अधिकाऱ्यांना आपल्या पालिकेत येऊच देत नाहीत. अशी नावेदेखील मुख्य सचिव कार्यालयाने काढली आहेत. तर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतरही ते बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. त्यामुळे त्यांना आता मेडिकल बोर्डापुढे उभे करण्याची कठोर पावले उचलली जात असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.