पहिल्याच पावसाने वाघांना दिलासा, विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात पाणवठ्यांमध्ये पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 05:59 PM2018-06-10T17:59:54+5:302018-06-10T17:59:54+5:30
विदर्भात मृग नक्षत्राचा पहिलाच पाऊस धडकला असून, व्याघ्र प्रकल्पात पाणवठ्यांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे.
- गणेश वासनिक
अमरावती : यंदा फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत वाघांना तृष्णा भागविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. मात्र, दोन दिवसांपूर्वी विदर्भात मृग नक्षत्राचा पहिलाच पाऊस धडकला असून, व्याघ्र प्रकल्पात पाणवठ्यांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पहिल्या पावसाने वाघांना जणू दिलासा मिळाला, हे चित्र अनुभवास येत आहे.
यावर्षी फेब्रुवारीपासूनच उन्हाची दाहकता जाणवायला लागली होती, तर मार्चमध्ये ती तीव्र झाली होती. त्यामुळे जंगलात वाघांसह वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. पहिल्यांदाच मार्चमध्ये नैसर्गिक पाणवठे आटू लागल्याने विदर्भातील वाघांची तृष्णा भागविणे वनविभागासाठी कसरत ठरली होती. ताडोबा-पेंच व्याघ्र प्रकल्पात एप्रिल, मे महिन्यात पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. यंदा तीव्र उन्हाळा तापल्याने याचा परिणाम वन्यजीवांवर झाला आहे. वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करताना पाणी समस्येवर मात करण्यासाठी व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांना विविध प्रश्नांच्या सामोरे जावे लागले. परंतु, विदर्भात ७ जूनपासून मान्सून दाखल झाला. मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जंगलासह व्याघ्र प्रकल्पात हिरवळ उगवली असून, नैसर्गिक पाणवठ्यावर पाण्याचे स्त्रोत वाढले आहे. मेळघाट, ताडोबा- अंधारी, पेंच, नवेगाव, नागझिरा या व्याघ्र प्रकल्पात पहिल्याच पावसाने वाघांना दिल्याचे वास्तव आहे.
वणव्यापासून मुक्तता
यावर्षी जंगलात आग लागण्याचा घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. वन्यजीवांचे आगीपासून नाहक नुकसान झाले. लाखो हेक्टर जंगल जळून खाक झाले. मेळघाट, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वणव्याची अधिक झळ जाणवली. मात्र, मान्सूनचा पहिला पाऊस पडताच वणव्याच्या घटनांपासून मुक्तता मिळाल्याचे वास्तव आहे. हल्ली सर्वत्र हिरवळ उगवली आहे. आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेता येत आहे. जंगलात हिरवळ उगवल्याने वणव्याच्या भीतीमुळे वनकर्मचाºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
वाघांच्या अधिवासांकडे लक्ष
मान्सूनचा पहिला पाऊस पडला. जंगलात हिरवळ उगवल्याने नैसर्गिक पाणवठ्यांकडे आता वाघांचा कल वाढणार आहे. त्यामुळे वाघांचे अधिवासदेखील बदलण्याची शक्यता व्याघ्र प्रकल्प अधिकाºयांनी व्यक्त केली. अशावेळी वाघांची शिकार होण्याचे संकेत असल्यामुळे वाघांच्या अधिवासांकडे लक्ष देण्याविषयी वरिष्ठांनी सूचना दिल्या आहेत.
वाघांचे अधिवास व त्यांच्या ये-जा करणाºया मार्गाची दक्षता घेण्याविषयी सूचना दिल्या आहेत. वाघांच्या मार्गावरून ग्रामस्थ अथवा वाटसरू जाणार नाही, याबाबत काळजी घेण्यासंदर्भात अवगत केले आहे. मान्सूनचा पहिला पाऊस वाघांना नक्कीच दिलासा देणारा ठरला आहे.
- सुनील लिमये,
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर