आधी राजीनामे, मगच कामकाज
By admin | Published: July 25, 2015 01:22 AM2015-07-25T01:22:06+5:302015-07-25T01:22:06+5:30
राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि शैक्षणिक अर्हतेबाबत खोटी माहिती दिल्याचे आरोप आहेत. यासंदर्भात ठोस पुरावेदेखील
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि शैक्षणिक अर्हतेबाबत खोटी माहिती दिल्याचे आरोप आहेत. यासंदर्भात ठोस पुरावेदेखील सादर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री चौकशीपूर्वीच संबंधित मंत्र्यांना क्लीन चिट देत असून, संबंधित मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत, तोवर सभागृहाचे कामकाज न चालू देण्याचा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना विखे पाटील यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, अनेक मंत्र्यांवर सबळ पुराव्यानिशी भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. अनेक मंत्र्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्ता दडविल्याचे स्पष्ट झाले आहे. काही मंत्र्यांच्या शैक्षणिक अर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणांची चौकशी करण्याऐवजी संबंधितांना ‘क्लीन चिट’ देण्याचा सपाटा मुख्यमंत्र्यांनी लावला आहे. भ्रष्टाचार व इतर आरोपांची चौकशी करण्यास सरकार तयार असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही. आरोप असलेले मंत्री पदावर राहणार असतील तर ती चौकशी निष्पक्ष होऊ शकणार नाही.
त्यामुळे संबंधित मंत्र्यांचे तातडीने राजीनामे घेऊन त्यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरू करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)