विधान परिषदेचा पहिला निकाल आला; भाजपचे अमरीश पटेल विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 10:00 AM2020-12-03T10:00:59+5:302020-12-03T10:01:20+5:30
Legislative Council By-Election : राज्यात पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आज मतमोजणी सुरु झाली असून सोलापूरमध्ये मतमोजणीसाठी दोन दिवस लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
धुळे : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांची आज मतमोजणी सुरु झाली आहे. याचा पहिला निकाल हाती आला असून धुळे - नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा भाजपाने धुव्वा उडविला आहे. भाजपचे अमरीश भाई पटेल हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.
भाजपचे अमरीश भाई पटेल यांना 332 मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांना 98 मते मिळाली. तर 4 मते बाद झाली आहेत.
दरम्यान राज्यात पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आज मतमोजणी सुरु झाली असून सोलापूरमध्ये मतमोजणीसाठी दोन दिवस लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झाली.
विलासनगर येथील शासकीय गोदामात असलेल्या मजमोजणी स्थळी सकाळी सहा वाजता सर्व अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. सर्वांना पुन्हा त्यांची जबाबदारी समजावून देण्यात आली. त्यानंतर सुरक्षा कक्षाचे सील तोडून मतपेट्या मतमोजणी कक्षात हलविण्यात आल्या.
निवडणूक निरीक्षक आनंद लिमये, निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यात मतपत्रिकांचे गठ्ठे बनवणे, सरमिसळ आदी कामे होत आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण ३० हजार ८६९ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ८६.७३ आहे.
मतमोजणी दोन कक्षात 14 टेबलवर होत आहे. 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात येतील. यातून 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे 40 गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर करण्यात येत आहेत. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण होईल. एकूण वैध मतांप्रमाणे ठरविण्यात आलेला मतांचा कोटा पूर्ण झालेला नसल्यास आवश्यकतेनुसार दुसऱ्या, तिसऱ्या अशी क्रमश: पसंतीची मते मोजण्यात येतील.