अकरावीच्या पहिल्या फेरीत ५२% प्रवेशनिश्चिती नियमित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 02:54 AM2020-10-25T02:54:59+5:302020-10-25T06:41:32+5:30
६ विभागीय मंडळे; एकूण १ लाख ४६ हजार २७५ प्रवेशनिश्चिती. अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राज्यात अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या विभागीय मंडळांमध्ये राबविली जात आहे. पहिल्या नियमित फेरीसाठी या ६ विभागीय मंडळांतून ३ लाख ५१ हजार ५३ विद्यार्थी पात्र ठरले होते
मुंबई - अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील प्रवेशनिश्चितीची मुदत संपली असून आता प्रवेशाच्या नियमित फेरी दोनला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यात एकूण १ लाख ४६ हजार २७५ प्रवेश निश्चित झाले आहेत. यामधील शून्य फेरी दरम्यान निश्चित झालेल्या प्रवेशाची संख्या २९ हजार ६८६ आहे, तर नियमित फेरीत १ लाख १६ हजार ५८९ विद्यार्थ्यांनी संपूर्ण राज्यातून आपले प्रवेश निश्चित केले. राज्यात नियमित फेरी १ साठी २ लाख २ हजार १३५ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट करण्यात आले होते. या फेरीत राज्यभरातून अलॉट विद्यार्थ्यांपैकी ५२ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश
निश्चित केले.
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राज्यात अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या विभागीय मंडळांमध्ये राबविली जात आहे. पहिल्या नियमित फेरीसाठी या ६ विभागीय मंडळांतून ३ लाख ५१ हजार
५३ विद्यार्थी पात्र ठरले होते
आणि २ लाख २ हजार १३५ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट करण्यात आले होते.
पहिल्या नियमित फेरीत प्रवेश अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख २० हजार १६० विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेशासाठी संमतीपत्र दाखल केले आहे तर १ लाख ६ हजार २७१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केले.
कोट्यांतर्गत १०,३१८ प्रवेश
कोट्यांतर्गत प्रवेशाची राज्यातील विद्यार्थीसंख्या
१० हजार ३१८ आहे. यामधील ७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले.
१३,२०८ जणांची प्रवेशाकडे पाठ
पहिल्या नियमित फेरीतील राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले असून १३ हजार २०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश अलॉट होऊनही प्रवेश घेतले नाहीत. तब्बल ८१ हजार ९७५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी रिपोर्टिंगच केले नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे.