Maharashtra CM News: उद्धव ठाकरेंच्या शपथविधीबद्दल शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 16:34 IST2019-11-27T16:34:01+5:302019-11-27T16:34:28+5:30
Maharashtra News: उद्धव ठाकरे हे राज्याचा कारभार चांगल्याप्रकारे सांभाळतील असा विश्वास शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra CM News: उद्धव ठाकरेंच्या शपथविधीबद्दल शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणतात...
मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला असून महाविकास आघीडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त सुद्धा ठरला असून 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.40 वाजता दादर येथील शिवतीर्थावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. तर उद्धव ठाकरे हे राज्याचा कारभार चांगल्याप्रकारे सांभाळतील असा विश्वास शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी व्यक्त केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखातीत बोलताना जोशी म्हणाले की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने याचे आनंद आहे. उद्धव ठाकरे हे कधीच कोणत्याही खुर्चीच्या मागे पळाले नाही. मात्र राज्यातील परिस्थिती आणि राजकरण पाहता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावेत असे सर्वांना वाटत होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुख्यमंत्रीपदासाठी होकार दिला असून, याचे मला फार समाधान असल्याचे मनोहर जोशी म्हणाले.
तसेच राज्याचे व पक्षाचे काम पाहणे यात खूप फरक आहे. पण उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने पक्षाचे काम पहिले व शिवसेना पुढे नेली. त्याच पद्धतीने ते नवीन प्रथा अमलात आणतील व एक यशस्वी मुख्यमंत्री होतील अशी मला अपेक्षा असल्याचे जोशी म्हणाले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे, तो अतिशय उत्तम निर्णय असून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
तसेच माझा शपथविधी सोहळा सुद्धा शिवाजीपार्कवर झाला होता. मात्र त्यावेळी भाजप-शिवसेना युती होती. ती शपथविधी मला आजही आठवतो असेही मनोहर जोशी म्हणाले. तसेच जो व्यक्ती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असतो त्याला खूप काम करावे लागते आणि उद्धव ठाकरे हे ते करतील यावर माझा विश्वास आहे. तसेच त्यांना उत्तम यश मिळावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्याचबरोबर हे सरकार फक्त पाच नाही तर त्यापुढे ही जाऊन काम करेल अशी मला अपेक्षा असल्याचे सुद्धा मनोहर जोशी यावेळी म्हणाले.