आधी कारणे दाखवा नोटीस, कारवाईची चर्चा; आता बावनकुळेंनी केलं रणजितसिंह मोहिते पाटलांचं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 23:03 IST2025-01-30T23:00:40+5:302025-01-30T23:03:29+5:30

BJP Chandrashekhar Bawankule And Ranjitsinh Mohite Patil News: निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप असलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना काही दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती.

first show cause notice discussion of action but now chandrashekhar bawankule congratulates ranjitsinh mohite patil know reason | आधी कारणे दाखवा नोटीस, कारवाईची चर्चा; आता बावनकुळेंनी केलं रणजितसिंह मोहिते पाटलांचं अभिनंदन

आधी कारणे दाखवा नोटीस, कारवाईची चर्चा; आता बावनकुळेंनी केलं रणजितसिंह मोहिते पाटलांचं अभिनंदन

BJP Chandrashekhar Bawankule And Ranjitsinh Mohite Patil News: विधानसभा निवडणुकीत भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याचा आरोप करण्यात आला होता. काही दिवसापूर्वी मोहिते पाटील यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. त्यामुळे मोहिते पाटील यांच्यावर भाजपाकडून कारवाई होऊ शकते, असा कयास राजकीय वर्तुळात होता. परंतु, आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणजितसिंह मोहिते पाटील भरभरून कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे  भाऊ धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवून माढा जागेवर विजय मिळवला. या निवडणुकीपासून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्याविरोधात काम केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या आरोपावरुन त्यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवली. यावर मोहिते पाटील यांनी उत्तरात पक्षविरोधी कोणतेही काम केले नाही, पक्षविरोधी कोणतीही भूमिका मांडलेली नाही, असे उत्तर दिले होते. परंतु, यानंतरही पक्षांतर्गत कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवली गेली होती. 

चंद्रशेखर बावनकुळेंनी केले रणजितसिंह मोहिते पाटलांचे अभिनंदन

चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वामध्ये आपण १००० सदस्य नोंदणी करून त्यांना भारत देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! भाजपाचे अंत्योदयाचे धोरण आपण जनमानसात घेऊन जात आहोत. यातून आपली लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि पक्ष विचारांप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते. आपल्या या समर्पित योगदानाबद्दल पक्षाध्यक्ष म्हणून मला आदर आणि अभिमान वाटतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची मान जगभरात उंचावली आहे, तर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र थांबणार नाही, याची सर्वांना खात्री आहे. संघटनपर्वात किमान एक हजार सदस्य भाजपासोबत जोडून आपण संघटना बळकट केलीच आहे, शिवाय महाराष्ट्राच्या विकासासाठीचे दूतही आपण जोडून घेतलेले आहेत. आपल्या या योगदानाबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन!, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: first show cause notice discussion of action but now chandrashekhar bawankule congratulates ranjitsinh mohite patil know reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.