नवी मुंबईत होणार पहिली ‘स्मार्ट’ सिटी

By admin | Published: June 13, 2016 02:59 AM2016-06-13T02:59:07+5:302016-06-13T02:59:07+5:30

महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एक महिन्यापासून आयुक्त तुकाराम मुंढे यांचा झंझावात सुरू आहे.

The first 'smart city' will be held in Navi Mumbai | नवी मुंबईत होणार पहिली ‘स्मार्ट’ सिटी

नवी मुंबईत होणार पहिली ‘स्मार्ट’ सिटी

Next

नामदेव मोरे,

 

नवी मुंबई- महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एक महिन्यापासून आयुक्त तुकाराम मुंढे यांचा झंझावात सुरू आहे. पदभार स्वीकारल्यापासून ७३१७ फेरीवाले, मार्जिनल स्पेस, झोपड्या, इमारती व इतर अतिक्रमणावर कारवाई केली आहे. आयुक्तांच्या कार्यशैलीमुळे स्मार्ट सिटीमधून बाहेर पडलेली नवी मुंबईच देशातील पहिली स्मार्ट सिटी होण्याचा बहुमान मिळवेल, असा विश्वास शहरातील जाणकार व्यक्त करू लागले आहेत.
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी स्पर्धेतून नवी मुंबई बाहेर पडल्यानंतर शहरवासीयांना धक्का बसला होता. देशातील स्मार्ट सिटीमध्ये पहिले नाव आपल्याच शहराचे असावे असे सर्वांना वाटू लागले होते. महापालिकेने प्रस्ताव फेटाळल्यानंतर स्वप्नभंग झाल्याचे दु:ख सर्वच शहरवासीयांना झाले होते. परंतु तुकाराम मुंढे यांनी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा धडाका सुरू केला आहे. प्रशासन प्रमुख कणखर असेल तर किती वेगाने कामे होतात याचे प्रात्यक्षिकच एक महिन्यात दाखविले आहे.
यापूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईचे सिंगापूर करण्याचे स्वप्न बोलून दाखविले होते. फेरीवाल्यांना हटविण्यासाठी स्वत: रोडवर उतरले होते. परंतु कारवाई झाली की पुन्हा अतिक्रमण होवू लागले होते. तुकाराम मुंढे यांनी सर्व विभाग अधिकाऱ्यांना लेखी आदेश देवून शहरातील पदपथ व रोडवरील सर्व फेरीवाल्यांना तत्काळ हटविण्यात यावे, शहरात एकही झोपडी वाढता कामा नये, अतिक्रमण वाढल्यास प्रथम अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा स्पष्ट इशारा दिला होता. मुंढे यांनी मालमत्ता कर विभागाचे प्रमुख प्रकाश कुलकर्णी व इतर पाच अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने विभाग अधिकाऱ्यांनी सुटीही न घेता अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेमध्ये झोकून दिले आहे.
महापालिकेची स्थापना झाल्यापासून प्रत्येक वर्षी फेरीवाल्यांविरोधात मोहीम राबविली जाते. फेरीवाल्यांना आळा बसावा यासाठी त्यांच्या जप्त केलेल्या साहित्याचा लिलाव करण्याचे धोरण निश्चित केले. परंतु या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी झाली नसल्याने फेरीवाल्यांची संख्या वाढतच गेली. परंतु मुंढे यांच्या झंझावातामुळे अधिकाऱ्यांनी एक महिन्यामध्ये तब्बल १०१० होर्डिंग व बॅनर हटविले आहेत. १९१६ फेरीवाल्यांना हटविले आहे. शहरातील तब्बल १८०८ झोपड्या निष्कासित केल्या आहेत. तब्बल २४९२ मार्जिनल स्पेसवर कारवाई झाली आहे.
एक महिन्यामध्ये ४१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. महापालिकेने एक महिन्यामध्ये ७३१७ अतिक्रमणांवर कारवाई झाली आहे. अतिक्रमण करणाऱ्यांकडून ३८ लाख ६८ हजार १११ इतके शुल्क वसूल केले आहे. याशिवाय डेब्रिज विरोधी पथकाने त्यांच्याकडून १९ लाख ३५ हजार ५०० रूपये वसूल केले आहेत.
अशाच प्रकारे कामे सुरू राहिली तर पुढील तीन वर्षात नवी मुंबईच देशातील स्मार्ट सिटी होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करू लागले आहेत. आयुक्तांनी शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा धडाका लावला असून त्यांना सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व शहरवासीयांनी सहकार्य
करण्याची आवश्यकता आहे, असे मतही शहरवासी व्यक्त करत असून मुंढे यांचा करिश्मा दिवसेंदिवस वाढत आहे.
>स्वत:हून काढली पाच हजार अतिक्रमणे
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून होर्डिंग, बॅनर, मार्जिनल स्पेस, झोपड्या मिळून ७३५८ अतिक्रमणांवर कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाचा दबदबा तयार झाला असून वर्षानुवर्षे मार्जिनल स्पेस स्वत:च्या मालकीचा असल्याप्रमाणे वागणाऱ्या जवळपास पाच हजार व्यापारी व फेरीवाल्यांनी स्वत:च सर्व अतिक्रमण हटविले आहे. मुंढे आल्यापासून सर्व रस्ते व पदपथ मोकळे होवू लागले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
>स्मार्ट सिटीसह सिंगापूरचे स्वप्न साकार
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी वारंवार नवी मुंबईचे सिंगापूर करण्याची संकल्पना बोलून दाखविली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यामुळे शहर अतिक्रमणमुक्त होण्याची आशा वाटू लागली आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने पहिले पाऊल पडले असून तीन वर्षे आयुक्त राहिले तर देशातील पहिली स्मार्ट सिटी नवी मुंबईच असेल फक्त सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
डेब्रिज माफिया हादरले
नवी मुंबईत डेब्रिज माफियांनी धुमाकूळ घातला होता. मुंबई, ठाणे परिसरातून शेकडो डंपर डेब्रिज नवी मुंबईत टाकले जात होते. आयुक्तांच्या कारवाईमुळे त्या डेब्रिज माफियांचे धाबे दणाणले.
>हॉटेलचालकांनाही दाखविला हिसका
नवी मुंबईमध्ये मार्जिनल स्पेसचा सर्वाधिक दुरूपयोग हॉटेलचालक करतात. प्रसारमाध्यमांनी आवाज उठविला की कारवाई केली जात होती. परंतु पालिकेचे पथक माघारी गेले की तत्काळ अतिक्रमण सुरू होत होते.
मुंढे यांनी आदेश दिल्यानंतर हॉटेलचाकांची मनमानी थांबविली आहे. वाशीमधील शांती, विंब्रो, परिचय, वसुंधरा, सिट्रस या हॉटेलचालकांनी केलेले सर्व अतिक्रमण हटविले आहे.
शहरात हॉटेल असलेल्या इमारतीमधील सार्वजनिक वापराच्या जागेतील अतिक्रमण हटविले आहे.
>आयुक्तांचा ठाम पाठिंबा
अतिक्रमण विरोधी कारवाई करताना यापूर्वी अधिकाऱ्यांवर वारंवार दबाव यायचा. फेरीवाला संघटना, राजकीय नेते व इतरांकडून दबाव आणला जात होता. यामुळे अनेक ठिकाणी इच्छा असूनही कारवाई केली जात नव्हती. परंतु तुकाराम मुंढे कायद्याच्या चौकटीत राहून ठाम भूमिका घेत असल्याने अतिक्रमण विभागावर राजकीय व इतर दबाव टाकण्याची हिंमत कोणीही करत नाही. यामुळे अतिक्रमण विरोधी पथकाचे सुभाष इंगळे, सहआयुक्त कैलास गायकवाड व सर्व विभाग अधिकारी दबावविरहित कारवाई करू लागले आहेत.

Web Title: The first 'smart city' will be held in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.