प्रार्थनाच्या रुपाने महाराष्ट्र टेनिसला प्रथमच ऑलिम्पिकचा मान
By admin | Published: June 11, 2016 09:42 PM2016-06-11T21:42:12+5:302016-06-11T21:42:12+5:30
जिल्ह्यातील बार्शीसारख्या ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय ख्यातीची टेनिसपटू प्रार्थना गुलाबराव ठोंबरे हिने सोलापूर जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापलीकडे पोहोचवले आहे
Next
>बसवराज मठपती
सोलापूर, दि. 11 - जिल्ह्यातील बार्शीसारख्या ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय ख्यातीची टेनिसपटू प्रार्थना गुलाबराव ठोंबरे हिने सोलापूर जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापलीकडे पोहोचवले आहे. तिचे जागतिक टेनिस मानांकन (डब्ल्यूटीए रँकिंग) 255 आहे. भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झासोबत अनेक स्पर्धामध्ये खेळताना तिने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. देशातील एकेरी आणि दुहेरीत ती सध्या द्वितीय स्थानावर आहे. 11 मे 2015 मध्ये तिला एकेरी मानांकन आणि 29 जून 2015 पासून महिला दुहेरी रँकिंगमध्ये द्वितीय स्थानी आहे. सध्या तिचे 255 मानांकन आहे.
आयटीएफ वूमेन्स प्रो-सर्किट टूर्नामेंटमध्ये आतार्पयत तिने दुहेरीचे 16 टायटल तर एकेरीचे तीन टायटल पटकावले आहेत़ 2007 साली 14 वर्षाखालील मुलींच्या गटात एटीपी रँकिंगमध्ये ती प्रथमस्थानी होती़. 2008 मध्ये अंडर 14 वर्षे वयोगटात भारताची नंबर वन टेनिसपटू राहिली आहे. 2010 मध्ये मुलींच्या 16 वर्षे वयोगटात भारताची नंबर वन टेनिसपटू बनण्याचा मानदेखील तिने मिळवला आहे. प्रार्थनाने (2016) नुकत्याच झालेल्या फेडकप आणि साऊथ एशियन गेम्समध्ये भारताकडून खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जानेवारी 2008 मध्ये मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे झालेल्या एटीपी अंडर-14 सीरिज मास्टर्स टूर्नामेंटमध्ये विजेती राहिली होती़. ऑगस्ट 2012 मध्ये चेन्नई येथे झालेल्या आदिदास नॅशनल चॅम्पियनशिप टूर्नामेंटमध्ये विजेती राहिली आहे.
2005-06 मध्ये झालेल्या 51 व्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत (14 वर्षाखालील) सुवर्णपदक पटकावल़े तसेच 2006-07 मध्ये झालेल्या 52 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. 2014-15 मध्ये तिने फेडकपमध्ये भारतीय संघाकडून खेळलेले आहे.
इंचियोन (दक्षिण कोरिया) येथे 2014 मध्ये झालेल्या 17 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने दुहेरी कांस्यपदक पटकावले आहे. त्रिवेंद्रम (केरळ) येथे 2015 मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एक कांस्य आणि एक रौप्यपदक पटकावले आहे. एप्रिल 2008 मध्ये चीन येथे झालेल्या वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप, मार्च 2008 मध्ये जकार्ता (इंडोनेशिया) आणि 2010 मध्ये कुचिंग (मलेशिया) येथे झालेल्या फेडकपमध्ये भारतीय संघाकडून खेळलेले आहे. नोव्हेंबर 2008 मध्ये हेनस स्पोर्ट्स-गुर्ड अथ को़च्या वतीने विजय अमर्त्यराज यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत ती विजेती राहिली आहे.
भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झानंतर प्रार्थना ठोंबरेच देशाची आघाडीची आंतरराष्ट्रीय टेनिसपटू म्हणून ओळखली जात आहे. बार्शीसारख्या ग्रामीण भागातील महिला खेळाडूची आंतरराष्ट्रीय पातळीर्पयत मजल मारण्याची तिची क्षमता वाखाणण्याजोगी आहे.