राज्यात पहिल्यांदाच असे घडले! आरटीओ कार्यालय सकाळी साडे सात वाजता उघडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 08:36 PM2020-09-21T20:36:32+5:302020-09-21T20:37:21+5:30
पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नागरिकांच्या सोयीसाठी चक्क सकाळी ७.३० वाजताच कार्यालय उघडून शिकाऊ परवान्यांसाठी चाचणी घेतली.
पुणे : कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर कार्यालयांतील गर्दी कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसारच कर्मचारी व नागरिकांना बोलविले जात आहे. त्याचा दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला आहे. पण दुसरीकडे पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नागरिकांच्या सोयीसाठी चक्क सकाळी ७.३० वाजताच कार्यालय उघडून शिकाऊ परवान्यांसाठी चाचणी घेण्यास सोमवार (दि. २१) पासून सुरूवात केली आहे. सकाळी ७.३० वाजता शिकाऊ चाचणीला सुरूवात होणे, असे राज्यात पहिल्यांदाच घडले आहे.
राज्यातील परिवहन कार्यालयांमध्ये शिकाऊ पक्का परवान्याच्या चाचणीसाठीचा कोटा वाढविण्याच्या सुचना परिवहन आयुक्तांनी दिल्या होत्या. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर कोटा वाढविल्यास संसर्गाचा धोका अधिक होता. त्यातच पुण्यामध्ये बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे आरटीओ अजित शिंदे यांनी चाचणीच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी सकाळी १०.३० वाजल्यापासून कार्यालयामध्ये शिकाऊ चाचणीला सुरूवात होत होती. पण ही वेळ सोमवारपासून सकाळी ७.३० करण्यात आली आहे. दिवसभरात प्रत्येक तासाला १०० याप्रमाणे ७०० जणांची चाचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे चाचणीसाठीचे वेटिंग १ ते २ दिवसांवर आले आहे.
एका दिवसांत ७०० जणांच्या चाचण्या घेणारे पुणे कार्यालय पहिले ठरणार आहे. तसेच सकाळी साडे-सात वाजता कार्यालय उघडून अनोखे उदाहरण पुढे ठेवल्याची चर्चा आहे. शिंदे यांच्या हस्ते फीत कापून या बदलाची सुरूवात झाली. यावेळी चाचणीच्या ठिकाणी फुलांची सजावट करून उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. सकाळी ७.३५ वाजता पहिल्या उमेदवाराला शिकाऊ परवाना देण्यात आला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, सहायक मोटार निरीक्षक प्रदीप ननावरे, गणेश विघ्ने, राजकुमार चोरमारे, रविंद्र राठोड, मोटार ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशनचे अध्यक्ष राजु घाटोळे आदी उपस्थित होते.
------------
कोटा वाढविण्यात आल्याने सुरक्षित अंतराचा प्रश्न निर्माण होणार होता. त्यासाठी कोटा कमी न करता वेळेत बदल करण्यात आला. या बदलामुळे दररोज ७०० जणांची चाचणी घेणे शक्य होणार आहे. विद्यार्थी, नोकरदार तसेच ज्यांना कार्यालयीन वेळेत येता येणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी ही वेळ सोयीची असेल. या बदलामुळे पुर्वनियोजित वेळेसाठी वाट पाहावी लागणार नाही आणि गर्दीही टाळता येणार आहे. बहुधा हा राज्यातील पहिलाच प्रयत्न आहे.
- अजित असेशिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे