साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्रकाशकाचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 07:00 AM2019-12-07T07:00:00+5:302019-12-07T07:00:04+5:30
व्यवसाय नव्हे, आवड म्हणून प्रकाशन क्षेत्रात कार्यरत असल्याची भावना
प्रज्ञा केळकर-सिंग-
पुणे : यंदा ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारी दरम्यान होत आहे. दर वर्षी संमेलनामध्ये एक प्रकाशक आणि एका साहित्यिकाचा विशेष सन्मान केला जातो. साहित्य संमेलनाच्या ९३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्रकाशकाचा सन्मान केला जाणार आहे. शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे यांना संमेलनात गौरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचाही सन्मान होणार आहे.
साहित्य संमेलनात महिला साहित्यिकांना अध्यक्षपद भुषवण्याची संधी खूप कमी वेळा मिळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून एक साहित्यिक आणि एक प्रकाशक यांचा संमेलनात विशेष सन्मान केला जातो. यंदा सुमती लांडे यांना गौरवण्यात येणार असल्याची माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ‘सन्मानाचा आनंद आहेच; प्रकाशनाच्या क्षेत्राकडे मी व्यवसाय म्हणून न पाहता आवडीचे काम म्हणून पाहते’, अशी प्रतिक्रिया सुमती लांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
लांडे म्हणाल्या, ‘१९८४-८५ च्या दरम्यान मी कामाला सुरुवात केली, तो काळ खूप वेगळा होता. लहानपणापासून पुस्तके वाचण्याची आवड होती. या आवडीचे व्यवसायात रुपांतर झाले. श्रीरामपूरमध्ये मी १९८४ साली शब्दालय पुस्तक भांडार सुरु केले. त्यानंतर १९८५ मध्ये दिवाळी अंकाला तर १९८९ मध्ये प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केली. पैशांची अडचण होतीच, त्यावर मात करत प्रकाशनाचा डोलारा उभा केला. आक्रमक स्वभावाची असल्याने संकटांवर मात करत पुढे गेले. लहान गावांमध्ये प्रदर्शने भरवली. व्यवसायाच्या निमित्ताने खूप प्रवास करायला मिळाला, माणसे भेटत गेली. त्यातून अनुभवविश्व संपन्न होत गेले. बाईच्या वाट्याला खूप कमी वेळा असे अनुभव येतात. १६ व्या वर्षी माझे लग्न झाले. त्यानंतर उर्वरित शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी बँकेची सुशिक्षित बेकार अशी कर्जयोजना होती. त्यातून २५ हजार रुपयांचे कर्ज घेतले आणि व्यवसाय उभा केला. आता पुढची पिढी सक्षमतेने हा डोलारा सांभाळत आहे, याचा अभिमान वाटतो.’
‘वाचन कमी होत आहे, असे मला वाटत नाही. गावोगावी गंभीर लेखन वाचणारे तरुण आहेत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. मी बुलढाणा, बीड, रत्नागिरी, सोलापूर अशा अनेक ठिकाणी प्रदर्शने घेऊन गेले आहे. आजचा वाचक विखुरला आहे. अनेकांना तंत्रज्ञान अवगत नाही. प्रकाशकांनी गावोगावी जाऊन वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपण त्यांच्यापर्यंत जात नसू तर वाचक कमी झाला आहे, असे बोलायचा आपल्याला अधिकार नाही’, अशा भावना लांडे यांनी व्यक्त केल्या.
----------
सुमती लांडे यांच्याविषयी :
श्रीरामपूर येथे शब्दालय प्रकाशनाचा व्याप सांभाळणा-या सुमती लांडे या साहित्य अकादमी तसेच मराठी सल्लागार समितीच्या सदस्य आहेत. एमए बीएडचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी ३५ वर्षांपासून लेखन आणि संपादनाची धुरा गेल्या समर्थपणे पेलली आहे. त्यांना महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषद उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार, जानकी प्रतिष्ठान तसेच श्रीरामपूर नगरपालिकेचा पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.