मालेगाव महापालिका निवडणुकीवर पहिल्यांदाच ‘ड्रोन’ची नजर
By admin | Published: May 22, 2017 07:42 PM2017-05-22T19:42:46+5:302017-05-22T19:42:46+5:30
सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानासाठी गत काही वर्षांपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात इव्हिएम मशिनचा वापर केला जातो.
Next
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 22 - सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानासाठी गत काही वर्षांपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात इव्हिएम मशिनचा वापर केला जातो. तर मतदानाच्या दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये शांततेत प्रक्रिया पार पडावी यासाठी पोलीस दल तैनात केले जाते. मात्र, पोलिसांना काम करताना अडचणी लक्षात घेऊन मालेगाव महापालिकेच्या मतदानाच्या दिवशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात चार ड्रोन कॅमे-यांचा वापर केला जाणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी राज्यात पहिल्यांदाच ड्रोनचा वापर केला जात असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी सोमवारी (दि़२२) पत्रकार परिषदेत दिली.
मालेगाव महापालिकेसाठी बुधवारी (दि़२४) मतदान होत असून ८४ जागांसाठी ३७४ उमेदवार रिंगणात आहेत़ तर एक नगरसेवक निवडणुकीपुर्वीच बिनविरोध निवडून आला आहे. मालेगाव महापालिकेसाठी पूर्व व पश्चिम मालेगाव असे भाग असून पूर्व भागात मुस्लिम संख्या अधिक तर पश्चिम मालेगावमध्ये हिंदूची संख्या अधिक आहे. पूर्व भागातील काही मतदान केंद्रे ही संवेदनशील असून तेथील मतदान केंद्रांसाठी जागेचे आकारमान मतदारसंख्येच्या तुलनेने कमी आहे. पूर्व मालेगावातील काही शाळांच्या मतदान केंद्रावर २६ पर्यंत बुथची संख्या असल्याने अशा ठिकाणी एकाच वेळी गर्दी होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
मालेगाव शहरातील संवेदनशील व गर्दीचे ठिकाणच्या मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस बल तैनात करण्यात आले आहेत. याबरोबरच पोलिसांच्या मदतीसाठी चार ड्रोन कॅमे-यांचा वापर केला जाणार आहे़. प्रत्येक ड्रोन कॅमे-याने टिपलेली दृश्य ही पोलीस कर्मचा-यांना लॅपटॉपवर दिसणार असून गर्दीचा अंदाज येणार आहे़. या पोलिसांसमवेत स्थानिक रहिवासी असणार असून गर्दीच्या ठिकाणची माहिती तत्काळ पोलिस नियंत्रण कक्ष तसेच संबंधित ठिकाणी ड्यूटीवर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वायरलेस तसेच लाऊडस्पीकरवरून दिली जाणार आहे़. या ड्रोन कॅमेºयामुळे पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे़
राज्यात महापालिका निवडणुकांसाठी कायदा व सुव्यवस्था तसेच गर्दीवरील नियंत्रणासाठी ड्रोन कॅमेरे वापरले जाण्याची ही पहिलीच वेळ असून तिचा वापर मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी केला जाणार आहे़. विशेष म्हणजे ड्रोन कॅमेºयाद्वारे आकाशतून अगदी गल्लीबोळापर्यंतची सूक्ष्म माहिती पोलिसांना उपलब्ध होणार आहे़. त्यामुळे या ड्रोनचा वापर पोलिसांना कशा प्रकारे लाभदायक ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़