महाराष्ट्रात प्रथमच नाशिकमध्ये एटीएमच्या माध्यमातून मिळणार दूध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 04:34 PM2018-01-25T16:34:33+5:302018-01-25T16:35:14+5:30
पैसे आणि अगदी पाण्याचे एटीएम सर्वांनाच माहिती आहे, परंतु नाशिकमध्ये चक्क दुधाचे एटीएम सुरू होत आहे. सिन्नर तालुका दूध संघाने हे पाऊल उचलले असून, नाशिक शहरात कॉलेज रोडवर बॉईज टाऊन स्कूलसमोर हे पहिले एटीएम सुरू होणार आहे.
नाशिक- पैसे आणि अगदी पाण्याचे एटीएम सर्वांनाच माहिती आहे, परंतु नाशिकमध्ये चक्क दुधाचे एटीएम सुरू होत आहे. सिन्नर तालुका दूध संघाने हे पाऊल उचलले असून, नाशिक शहरात कॉलेज रोडवर बॉईज टाऊन स्कूलसमोर हे पहिले एटीएम सुरू होणार आहे.
नाशिक तालुक्यातील सिन्नर तालुका दूध उत्पादक संघ हा प्रगत असून, नाशिकमधील लष्करी लावणीला दूध पुरवठा केला जातो, त्यांच्या वतीने राज्यातील पहिलं एनी टाईम मिल्क ही संकल्पना अमलात आली आहे. या वातानुकूलित एटीएममध्ये ग्राहकाच्या मागणीनुसार कार्ड मशीनमध्ये टाकल्यानंतर 10 रुपयांपासून पाच-दहा लिटर दूध मिळू शकेल. विशेष म्हणजे याच ठिकाणी दूध तपासून त्यातील फॅट्स आणि अन्य घटक मोफत तापाणीची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे, अशी माहिती दूध संघाचे प्रमुख आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली.
या ठिकाणी सायवाल गायीचे दूध देखील उपलब्ध असून, 80 रुपयाने ते देण्यात येणार आहे. शेतकऱ्याच्या गोठ्यातील थेट फ्रेश म्हणजे प्रक्रिया न करता थेट दूध देण्याची व्यवस्था आहे. ज्या ग्राहकांना थेट गोठे बघायचे त्यांना ते देखील दाखविले जाणार आहे. या एटीएम मशीनसाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च आला आहे. शेतकऱ्यांकडील दूध कोणत्याही भेसळीशीवाय ग्राहकांना मिळावे, यासाठी हा उपक्रम असून सिन्नर तालुका दूध उत्पादक संघ आता थेट मार्केटिंगमध्ये उतरला आहे.
नाशिक शहरातील या पहिल्या एटीएमनंतर मुंबईसह 50 एटीएम सुरू करण्याचा दूध संघाचा मानस असल्याचे कोकाटे यांनी सांगितलं. या प्रकल्पासाठी शेअर देखील संघ सुरू करीत असून, 5 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे, शेअर धारकांना स्वस्तात दूध तसेच लाभांश देखील देण्यात येणार आहे. संघ दूध विक्रीबरोबरच दुग्धजन्य पदार्थ आणि मिठाई देखील तयार करणार असून, सिन्नर-घोटी मार्गावर 10 एकर जागेत काम सुरू आहे. मार्च महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे, असेही ते म्हणाले.