संघाचा विजयादशमी उत्सव प्रथमच ‘फुलपॅन्ट’मध्ये !
By admin | Published: October 2, 2016 01:18 AM2016-10-02T01:18:24+5:302016-10-02T01:18:24+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. संघाच्या गणवेशात ‘फुलपॅन्ट’चा समावेश झाल्यानंतरचा हा पहिलाच विजयादशमी उत्सव असेल.
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. संघाच्या गणवेशात ‘फुलपॅन्ट’चा समावेश झाल्यानंतरचा हा पहिलाच विजयादशमी उत्सव असेल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय आर्थिक सेवेचे १९७६ बॅचचे अधिकारी सत्यप्रकाश राय उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी मार्गदर्शन करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
रेशीमबाग मैदान येथे ११ आॅक्टोबरला सकाळी ७.४० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात, पाकिस्तानविरोधात भारताने केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’, पाकिस्तानचे पाणी थांबविण्यासंदर्भात संघ परिवाराने उचललेला मुद्दा, केंद्र शासनाची कामगिरी, सामाजिक समरसता, आरक्षणाचा मुद्दा, ग्रामविकास, दुर्गम क्षेत्रांचे मागासलेपण, संघ-शासन-समाजाचा समन्वय इत्यादींसंदर्भात डॉ. भागवत मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. यावेळी केंद्र तसेच राज्यातील मंत्रीदेखील उपस्थित राहणार आहेत.
देशात सत्ताबदल झाल्यानंतरचा हा तिसरा विजयादशमी उत्सव असला तरी शाखांची वाढलेली संख्या, संघाचा वाढता दबदबा, पाकिस्तानविरोधातील केंद्र शासनाचे कडक धोरण यामुळे यंदादेखील यासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जास्तीत जास्त नागरिक यावेळी सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या सोहळ्याचे ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेही विजयादशमी उत्सवात प्रथमच गणवेशाच्या ‘फुलपॅन्ट’मध्ये दिसतील. (प्रतिनिधी)