राज्यात यंदा प्रथमच ‘पेपरलेस’ पशुगणना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 03:21 PM2018-11-14T15:21:16+5:302018-11-14T15:21:54+5:30
अकोट(जि. अकोला): दर पाच वर्षातून होणारी पशूगणना राज्यात यंदा प्रथमच पेपरलेस होत आहे. ही गणना ‘टॅबलेट पीसी’द्वारे करण्यात येत असून, यासाठी विशेष प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- विजय शिंदे
अकोट(जि. अकोला): दर पाच वर्षातून होणारी पशूगणना राज्यात यंदा प्रथमच पेपरलेस होत आहे. ही गणना ‘टॅबलेट पीसी’द्वारे करण्यात येत असून, यासाठी विशेष प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पेपरलेस पशूगणना करण्याचा हा देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.
देशात दर पाच वर्षातून एकदा पाळीव प्राणी, मत्स्य उद्योग तथा दुग्ध व्यवसाय विषयक औजार/मशिनरी साहित्याची गणना करण्यात येते. यंदा होणारी २० वी पशुगणना राज्यात प्रथमच टॅबलेट पिसीवर करण्यात येत आहे. याकरीता प्रशासनाकडून विशेष प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून,या प्रगणकांना प्रशिक्षित करण्यात आलेआहे.
गाय-बैल, म्हशी, कुक्कुट पक्षी, घोडे, खेचर, कुत्रे, डुकरे इत्यादी सोबतच भटके कुत्रे, गाई अशा सर्व प्रकारच्या प्राण्यांची गणना यामध्ये करण्यात येत आहे. मांस विक्री दुकाने, मत्स्य व्यवसायात गुंतलेली कुटुंब, यांची सुद्धा सविस्तर माहिती संकलीत करून देशभरातील पशुसंवर्धन विषयक धोरण व योजना ठरविल्या जातात. त्यामुळे या पशुगणनेला विशेष महत्त्व आहे.
अकोला जिल्ह्यात तालुकास्तरावर याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या असून प्रत्यक्ष पशुगणनेला सुद्धा सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व कुटुंबांकडून माहिती मिळवण्यासाठी पशुगणना प्रगणक लवकरच घरोघरी येतील तेव्हा त्यांना आवश्यक माहिती पुरविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अकोट येथे प्रशिक्षण कार्यशाळा
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने अकोट येथे प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पशुसंवर्धन सह आयुक्त डॉ. ए. व्हि. कडू, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. आर. बी. निचळ, प्रशिक्षक डॉ. नंदकिशोर चिपडे, डॉ. राजधन वानखडे, डॉ. अरूण पाटील, डॉ. वैभव पटेल, डॉ. राधेश्याम चव्हाण, डॉ. आर. पी. म्हात्रे, एस. एफ. मोरखडे, डॉ. एन. जे. घोंगे, डॉ. एन. एल. काळपांडे यांच्याह तालुक्यातील पशूगणना प्रगणक प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया' च्या धर्तीवर पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेत पशुगणने सारखे व्यापक कार्य पेपरलेस केले आहे. हा देशातील प्रथमच प्रयोग असून, डिजिटायझेनमुळे पशुगणना अधिक अचूकपणे व विहित कालावधीत पूर्ण होऊ शकेल. तसेच कागद व वेळेचीही बचत होण्यात मदत होणार आहे.
- डॉ. नंदकिशोर चिपडे,पशुगणना प्रशिक्षक, जिल्हा परिषद, अकोला.