दुष्काळाचा पहिला बळी

By admin | Published: July 2, 2014 12:20 AM2014-07-02T00:20:07+5:302014-07-02T00:31:10+5:30

गोरेगावच्या शेतकर्‍याने संपविली जीवनयात्रा

The first victim of drought | दुष्काळाचा पहिला बळी

दुष्काळाचा पहिला बळी

Next

अकोला: अतवृष्टीने खरीप हंगामापाठोपाठ रबीची पिकेही गेली. हाती पैसा नसल्याने नव्या हंगामासाठी कर्ज काढून महागाचे बियाणे घेतले. होता नव्हता तो सर्व पैसा खर्च करून टाकला. पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा केली. महिना उलटूनही थेंब पडला नाही. कर्जाचा डोंगर चढला, होता नव्हत्या त्या पैसात बियाणे खरेदी केले. आता पेरणी कशी होईल, मुलांच्या शिक्षणाचे काय? या चिंतेने ग्रासलेल्या गोरेगाव खुर्द येथील शेतकरी विजय काशिराम तायडे यांनी मंगळवारी शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दुष्काळाने त्यांच्या रुपात जिल्ह्यात पहिला बळी घेतला.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार गोरेगाव खुर्द येथे राहणारे शेतकरी विजय काशीराम तायडे (४५) यांच्याकडे ४ ते ५ एकर शेती आहे. त्यांनी ५0 हजारांचे बँकेतून कर्ज काढले होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे त्यांच्या शेतातील उभे पीक वाहून गेले. डोक्यावर बँकेचे कर्ज, दोन मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह या विवंचनेत विजय तायडे सापडले होते. मोठा मुलगा बारावीत शिकतो, तर लहान मुलगा सातवीत शिकतो. यावर्षी पेरणी करण्यासाठी हजारो रुपयांचे बी-बियाणे, खत खरेदी केले; परंतु पाऊस येत नसल्याने केलेला खर्च वायो जातो की काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. वाडेगाव पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला.या चिंतेतूनच त्यांनी मंगळवारी दुपारी त्यांच्या निंबी परिसरातील शेतात जाऊन झाडाला दोरीने गळफास घेतला.

** पेरणी आणि मुलांच्या शिक्षणाची होती काळजी
जिल्ह्यात अजून पाऊस आला नाही. जून महिना संपत आला तरी पेरणी झाली नाही, त्यामुळे उशीरा पेरणी केल्यावर शेतात पिकेल की नाही याची शास्वती नाही. शेतात उत्पादन झाले नाही तर बँकेचे कर्ज कसे फेडावे? मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? याची चिंता शेतकरी विजय काशिराम तायडे त्यांना सतावत होती. सध्या शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षणाचा खर्चही वाढला होता. अखेरीस त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला व आपली जीवनयात्रा संपविली.

Web Title: The first victim of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.