हंटा व्हायरसचा पहिला बळी
By admin | Published: October 16, 2016 04:33 AM2016-10-16T04:33:37+5:302016-10-16T04:33:37+5:30
दुर्मीळ हंटा व्हायरसची लागण झालेल्या कुलाब्यातील १२ वर्षीय मुलाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. या वर्षातील हा हंटा व्हायरसचा आढळलेला पहिला रुग्ण होता.
मुंबई : दुर्मीळ हंटा व्हायरसची लागण झालेल्या कुलाब्यातील १२ वर्षीय मुलाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. या वर्षातील हा हंटा व्हायरसचा आढळलेला पहिला रुग्ण होता. भाटिया रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू होते. त्यानंतर, त्याच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी त्याला गावी नेले होते, तिथे या मुलाचा सकाळी मृत्यू झाला.
२०१५ मध्ये कुर्ल्यातील ३९ वर्षीय पुरुषास हंटा व्हायरसची लागण झाली होती. या वर्षी आतापर्यंत हंटा व्हायरसचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. २९ सप्टेंबरला कुलाबा येथे राहणाऱ्या १२ वर्षीय मुलाला भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या मुलाला ताप, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. या मुलाच्या डेंग्यू, मलेरिया, लेप्टोच्या तपासण्या करण्यात आल्या, पण या तपासण्या निगेटिव्ह आल्या. मुलगा खोकताना रक्त पडू लागले. या मुलाची प्रकृती खालावल्याने, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती भाटिया रुग्णालयाचे श्वसनविकार तज्ज्ञ डॉ.आदित्य अग्रवाल यांनी दिली.
लेप्टोची तपासणी निगेटिव्ह आल्यानंतर, त्याची हंटा व्हायरसची तपासणी करण्यात आली. या आधी दोन रुग्णांमध्ये त्यांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदनात त्यांना हंटा व्हायरसची लागण झाल्याचे निदान झाले होते. या मुलाची प्रकृती अधिकच खालावली होती. हंटा व्हायरसवर उपचार नाहीत, पण यात अवयव निकामी होण्यापासून वाचवणे आवश्यक असते. या मुलाच्या नातेवाईकांनी हंटा व्हायरस असल्याचे निदान होण्याआधीच रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला होता. त्यांना डिस्चार्ज केल्यानंतर हंटा व्हायरस तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या पालकांनी कळवल्याचे डॉ. आदित्य यांनी सांगितले. डॉ. आदित्य यांच्याबरोबर डॉ. विनित सदानी आणि डॉ. समीर शहा या मुलावर उपचार करत होते. (प्रतिनिधी)
हंटा व्हायरसची लागण ही उंदरांमुळेच होते. उंदराच्या चाव्यामुळे अथवा उंदराच्या मूत्रातून हा व्हायरस शरीरात प्रवेश करतो. सुदृढ व्यक्तीच्या शरीरात हा व्हायरस गेल्यास त्यालाही त्रास जाणवतो. या आजारावर उपचार उपलब्ध नाहीत. हंटा व्हायरस हा अवयवांवर हल्ला करून अवयव निकामी करतो, त्यामुळे गुंतागुंत वाढते.