मराठवाड्यात पहिले यकृतदान, कुटुंबीयांच्या निर्णयाने तिघांना नवे जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:53 PM2017-11-25T23:53:02+5:302017-11-25T23:53:41+5:30
मराठवाड्यातील पहिल्या अवयवदानानंतर तब्बल २२ महिन्यांनी यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करत शनिवारी वैद्यकीय क्षेत्रात औरंगाबादने आणखी एक नवा अध्याय लिहिला.
औरंगाबाद : मराठवाड्यातील पहिल्या अवयवदानानंतर तब्बल २२ महिन्यांनी यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करत शनिवारी वैद्यकीय क्षेत्रात औरंगाबादने आणखी एक नवा अध्याय लिहिला. ब्रेनडेड रुग्णाच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला अन् मराठवाड्यातील पहिले यकृत प्रत्यारोपण झाले. अवयवदानाने तिघांना नवीन आयुष्य मिळाले.
येथील दिनेश आसावा (५५) यांना गुरुवारी सायंकाळी ब्रेन हॅमरेज झाले. कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. ब्रेन हॅमरेजचे निदान होताच मोठ्या रुग्णालयात दाखल केले. ब्रेनडेड असल्याचे डॉक्टरांनी निदान केले. तेव्हा कुटुंबीयांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली. कमलनयन बजाज रुग्णालयात ब्रेनडेड समितीने त्यांची संपूर्ण तपासणी केली. त्याची विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीचे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांना माहिती देण्यात आली.
एमजीएम रुग्णालयात यकृत, एक किडनी माणिक हॉस्पिटल, तर एक किडनी बजाज रुग्णालयातील रुग्णास देण्याचे नियोजन करण्यात आले. मराठवाड्यात पहिल्यांदाच यकृत प्रत्यारोपण होणार असल्याने मुंबईहून ग्लोबल हॉस्पिटलचे पथक औरंगाबादेत आले.
शनिवारी पहाटेपासून अवयवदानाची प्रक्रिया सुरू झाली. रुग्णालयापर्यंत अवयव पोहोचविण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया तब्बल ८ तास चालली.
...अन् हृदयाची धडधड थांबली
मुंबई-पुण्यासह देशातील सर्व प्रत्यारोपण करणा-या रुग्णालयांना अवयवदान प्रक्रियेची माहिती देण्यात आली. हृदय चेन्नईला पाठवण्यासाठी हालचाली झाल्या; परंतु हृदयदान करता आले नाही.
- हृदयदानासाठी विमान सेवेपोटी येणारा खर्च उचलण्याची तयारीही आसावा कुटुंबियांनी दर्शविली. शहरात एअर अॅम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध नसल्यानेही अडचण झाली. एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली असती तर कुठेतरी हृदय प्रत्यारोपण शक्य झाले असते, असे डॉ. सुधीर कुलकर्णी म्हणाले.