प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरू
By admin | Published: May 30, 2016 01:23 AM2016-05-30T01:23:41+5:302016-05-30T01:23:41+5:30
अनेक महाविद्यालयांमधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन सुरू झाली आहे.
पुणे : शहरातील नामांकित महाविद्यालयांसह अनेक महाविद्यालयांमधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन सुरू झाली आहे. मात्र, येत्या ३ जून रोजी राज्य मंडळाकडून बारावीच्या मूळ गुणपत्रिकांचे वितरण झाल्यानंतरच काही महाविद्यालयांचे प्रवेश सुरू होणार आहेत. यंदा बहुतांश सर्वच महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.
सर्व विद्यापीठांनी व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने प्रवेश द्यावेत, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) स्पष्ट केले आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांसह इतरही काही महाविद्यालयांनी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याची तयारी केली आहे.
बारावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांना येत्या ३ जून रोजी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मूळ गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. परंतु, गुणपत्रिकांच्या वितरणापूर्वीच स. प. महाविद्यालय, गरवारे महाविद्यालयाने आॅनलाइन पद्धतीने प्रवेश अर्जांची स्वीकृती सुरू केली आहे. मात्र, मॉर्डन व फर्ग्युसन महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया ३ जूननंतर सुरू होणार आहे.
स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ म्हणाले, ‘‘महाविद्यालयाने आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. महाविद्यालयात प्रवेश घेण्यास आलेले विद्यार्थी ओळखपत्र घेऊनच बाहेर पडतील, या पद्धतीने यंदा प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान अभ्यासक्रमाच्या ४८०, वाणिज्य अभ्यासक्रमाच्या ४८०, बीबीए ८० आणि बीसीएसच्या ८० आणि प्रथम वर्ष कला अभ्यासक्रमाच्या ३६० जागांवरील प्रवेश आॅनलाइन पद्धतीने होतील. त्यासाठी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावरून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. येत्या ८ जूनपासून गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करून प्रवेश दिले जाणार आहेत. ३० मेपासून द्वितीय वर्षाचे प्रवेश सुरू होत आहेत.’’
गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत गुप्ता म्हणाले, ‘‘प्रथम वर्ष विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र, कॉम्प्युटर सायन्स व बायोटेक्नॉलॉजीसाठी गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जातील. प्रवेशाबाबतची सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सध्या आॅनलाइन अर्ज भरण्यास उपलब्ध करून देण्यात आले असून, येत्या ६ जूनपासून प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होईल.’’
तीन जूनपासून आॅनलाइन अर्ज उपलब्ध : झुंजारराव
मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव म्हणाले,‘‘महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश येत्या ३ जूनपासून आॅनलाइन पद्धतीने सुरू केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांकडून प्रथमत: मेरिट फॉर्म भरून घेतला जाईल. त्यानंतर तीन प्रवेश याद्या प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जाणार आहेत. महाविद्यालयात प्रथमच बीबीएम-आयबी तसेच बीएस्सी ब्लेन्डेड हे दोन नवीन अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत. कला, वाणिज्य व विज्ञान अभ्यासक्रमाशिवाय बीएस्सी बायोटेक आणि अॅनिमेशन अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी ४५ जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.
फर्ग्युसन महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया येत्या ३ जूनपासून सुरू केली जाणार आहे. बीएस्सी व बी.व्होक अभ्यासक्रमाचे आॅनलाइन प्रवेश अर्ज ३ ते ९ जून या कालावधीत भरता येतील. तर १३ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करून प्रवेश दिले जातील. प्रथम वर्ष अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज ३ ते ८ जून या कालावधीत स्वीकारून ११ जून रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील.