मासे वाहतूक करणारा ट्रक पलटला; मदत सोडून लोकांनी पळवले मासे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 07:08 PM2021-09-04T19:08:07+5:302021-09-04T19:08:38+5:30
मासे घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर झाला होता पलटी. शनिवारी पहाटे घडली घटना.
शिरपूर : खोपोलीहून इंदूरकडे मासे घेऊन जाणारा ट्रक मुंबई आग्रा महामार्गावर पलटी झाला. या ट्रकमधील सर्व मासे रस्त्याच्या कडेला पडल्याने मासे घेण्यासाठी लहानमुलांसह आबालवृद्धांची मोठी गर्दी झाली.
शनिवारी पहाटे ५ वाजता मासे वाहतूक करणारा ट्रक मुंबई आग्रा महामार्गावरील चोपडा फाट्याजवळ असलेल्या उड्डाणपुलाजवळ पलटी झाला. या ट्रकमधील थर्माकॉलच्या खोक्यांमध्ये असलेले मासे रस्त्याच्या बाजूला असलेल्या कपाशीच्या शेतात पडले. या घटनेची माहिती शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात वार्यासारखी पसरली. त्यानंतर मासे पकडण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली. परिसरातील नागरिक तसेच महामार्गावर वाहतूक करणार्या वाहनचालकांनी मासे नेण्यासाठी एकच गर्दी केली. यावेळी घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिस स्थानकाचे पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु मासे उचलून नेणारे नागरिक पोलिसांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून मासे उचलण्यात व्यस्त होते.
नागरिकांच्या हाती जेवढे मासे लागले. त्या व्यतिरिक्त उरलेल्या माशांना भरून ट्रक चालकाने ट्रक क्रेनद्वारे रस्त्यावर सरळ केली. चालकाने थोडेफार उरलेले मासे पुनः ट्रकमध्ये भरून तेथून निघणेच पसंत केले. या घटनेची पोलिसात तक्रार न करता ट्रक चालक मासे घेऊन घटनास्थळावरून निघून गेला. विविध प्रकारचे खाण्यालायक असलेले सर्व मासे थर्माकॉलच्या खोक्यात बर्फात ठेवलेले होते. परंतु ट्रक पलटी झाल्याने सर्व खोकी रस्त्याच्या कडेला तर काही शेतात पडली.
मासे वाहतूक करणारी आयशर चोपडा फाट्यावर पलटी झाली. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. रस्त्यावर पडलेले मासे उचलण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु काही वेळानंतर पोलिसांच्या सहकार्याने ट्रक चालकाने आपले मासे पुन्हा खोक्यामध्ये भरले. पोलिसात तक्रार न देता उर्वरित मासे घेऊन चालक तिथून इंदूरकडे निघून गेला.
सुरेश शिरसाठ, पोलीस निरिक्षक सांगवी पोलीस स्थानक