अहमदनगरमध्ये मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांची चिंगळीतुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 06:19 PM2017-10-27T18:19:38+5:302017-10-27T18:23:19+5:30
अहमदनगर : राहुरी येथील मुळा धरणात मासेमारी करणा-या स्थानिक आदिवासी जमातीतील व्यावसायिकांना डावलून मुळा धरणातील मत्स्यमारीचा पाच वर्षाचा ठेका नवी मुंबई येथील मे. ब्रिज फिशरिज या कंपनीला दिल्याच्या निषेधार्थ पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्याचे मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांची चिंगळीतुला करण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले. मुळा धरणात मासेमारी करणा-या व्यावसायिकांनी चिंगळी माशांची माळा गळ्यात घालून जानकर यांचा निषेध केला.
या आंदोलनात अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, प्रा. सुभाष कडलग, बाबा शेख, भगवान बर्डे, हिरामन शिंदे, भारत पवार, संतोष शिंदे, ज्ञानदेव बडे, दौलत बडे, विष्णू माळी, छबुराव पवार, शिवराम माळी, सलिम शेख, देवराम पारधी, अॅड. लक्ष्मण पोकळे, आमीर शेख, शक्तीलाल गंगे, अल्ताफ शेख, सुनिल माळी, दिपक साळुंके, रंगलाल भोई, राजेश परदेशी, गणेश मोरे, सुरज पवार, चाँद शेख, गौतम गायकवाड, विजय मगर यांच्यासह मुळाथडी व मुळामाई मच्छी व्यावसायिक सहकारी संस्थेचे सभासद सहभागी झाले होते.
जिल्ह्याला वरदान ठरलेले मुळा धरण या वर्षी पुर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणात मुळाथडी मच्छी व्यावसायिक सहकारी संस्थेचे ८७१ स्थानिक सदस्य मासेमारीद्वारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे. मात्र महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाने परस्पर मुंबईच्या मे. ब्रिज फिशरिज कंपनीला २०१७-२०२१ या पाच वर्षासाठी मत्स्यमारीचा ठेका दिल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक मासेमारीचा व्यवसाय करणा-यांवर उपासमारीची कु-हाड कोसळली आहे. मासेमारी करणारे स्थानिक आदिवासी व्यावसायिक अशिक्षित असल्याने त्यांना डावलून आॅनलाईन पद्धतीने मुंबईच्या कंपनीस मत्स्यमारीचा ठेका देण्यात आला. सुमारे एक कोटी किंमतीचा मत्स्यमारीचा ठेका मुंबईच्या कंपनीला काही लाखात देण्यात आला आहे. हा ठेका रद्द करुन, स्थानिक आदिवासी जमातीतील मासेमारी करणा-यांना देण्याची मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभय महाजन यांना देण्यात आले.