मच्छीमार बंदरांना धोका

By admin | Published: August 2, 2015 02:21 AM2015-08-02T02:21:38+5:302015-08-02T02:21:38+5:30

अजमल कसाब व त्याच्या साथीदारांनी समुद्रमार्गे येऊन मुंबईवर केलेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून नौदलाने केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील सागरकिनाऱ्यावरील ५२५ मासेमारी

Fishermen pirates risk | मच्छीमार बंदरांना धोका

मच्छीमार बंदरांना धोका

Next

- नारायण जाधव,  ठाणे
अजमल कसाब व त्याच्या साथीदारांनी समुद्रमार्गे येऊन मुंबईवर केलेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून नौदलाने केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील सागरकिनाऱ्यावरील ५२५ मासेमारी बंदरांपैकी मुंबईच्या बधवार पार्क, गोराई-मनोरी, उत्तन, रेवस, मांडवा, दाभोळ, मालवणसह ९१ बंदरे अतिसंवेदनशील आढळली आहेत. यामुळे गुजरात व तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर या बंदरांवर येणाऱ्या मासेमारी नौकांसह खलाशांची नोंद ठेवण्यासाठी गृह विभागाच्या निर्देशानुसार मत्स्यविकास विभागाने टोकन पद्धत राबवून २४ तास तीन पाळ्यांत सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, २७९ सुरक्षारक्षकांसह २३ पर्यवेक्षक असे ३०२ सुरक्षा कर्मचारी या बंदरांवर लवकरच दिसतील. यासाठी वर्षाला पाच कोटी ४१ लाख तीन हजार २६० खर्च होणार आहे.
राज्याच्या सागरी सुरक्षेसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सागरी सुरक्षा समिती स्थापन केली असून सध्या कोस्टगार्ड, कस्टम व सागरी पोलीस यंत्रणेमार्फत समुद्रात ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या नौकांसह मच्छीमार नौकांची तपासणी करून नोंद ठेवली जाते. मात्र, मुुंबईवरील २६/११ चा अतिरेकी हल्ला करणारे अतिरेकी डहाणूच्या किनाऱ्यामार्गे मुंबईत शिरले होते. तेव्हापासून मुंबईसह राज्याच्या सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या हल्ल्यानंतर नौदलाने मच्छीमार नौकांचे अवागमन असलेल्या राज्यांतील ५९१ लँडिंग पॉइंट्सची तपासणी केली. त्यात ९१ पॉइंट्स अतिरेकी हल्ल्यांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आढळले. यातील ५६ पॉइंट्स मत्स्यविकास विभागाच्या अखत्यारीत येतात, तर ३५ लँडिंग पॉइंट्सवर मासळी उतरवली जात नाही. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याने या सर्व ९१ मच्छीमार बंदरांवर सुरक्षा तैनात करणे आवश्यक आहे. त्यानुसार, या बंदरांवर ये-जा करणाऱ्या नौकांचे अवागमन, कागदपत्रांची तपासणी आणि खलाशांची नोंद ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, मासेमारी नौकेची, खलाशांची नोंद घेऊन त्यांना एक टोकन दिले जाणार आहे. सदर नौका परत बंदरात आल्यावर त्यांना हे टोकन परत करावे लागेल. प्रत्येक नौकेची हालचाल टिपणार असून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सागरी पोलीस, मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांनी तत्काळ मदत करणे सक्तीचे केले आहे.

पालघर जिल्हा : नरपाडा-डहाणू, गुंगवाडा-धाकटी डहाणू, वरोर, तडीयाळ, कंबोडे, घिवलीगाव, रानगाव, वसई-बॅसिन, खोचिवडे, पाचूबंदर, पाणजू, भुईगाव, कोल्लार, सुरूचीबाग, अर्नाळा, वैतरणा, मारबंळपाडा
रायगड जिल्हा : मांडवा, रेवस, जुनी आरसीएफ जेट्टी, थळनवगाव, अलिबाग चौपाटी, रेवदंडा ब्रिज-१, रेवदंडा ब्रिज-२, साळाव, नांदगाव, मुरूड खोरा, आगरदांडा-१, राजपुरी, दिघी पोर्ट जेट्टी, दिघी पॅसेंजर जेट्टी, शेखाडी, जीवनाबंदर, बागमांडला, मांदाड-१, दादर, आंबेत

रत्नागिरी जिल्हा : वेशवी, वेळास, केळशी, दाभोळ, वेलदूर, रानवी, पडवे, जयगड, नांदिवडे, सैतवडे, जांभारी, गणपतीपुळे, काळबादेवी, रनपार-घोळप, पूर्णगड, मिऱ्या, भगवती बंदर, नेवरे, कुर्ले, साखरी नाटे, मुसाकाझी, अंबोळगड, माडबन
सिंधुदुर्ग जिल्हा : मीठमुंब्री-तारांबुरी, कुणकेश्वर, काटवन, तांबडडेग, सर्जेकोट-मिऱ्याबाद, तारकर्ली-काळेथर, मालवण जेट्टी, खवणे, वेंगुर्ला, मोचेमाड, आरवलीटाक, तेरेखोल, देवगड, गजबादेवी.

मुंबई : बधवार पार्क, गणेशमूर्तीनगर, गीतानगर, गोराई, मनोरी, वांद्रे सागरी सेतू जेट्टी, सांताक्रुझ जेट्टी, वर्सोवा, पिरवाडी, माणिकटोक
ठाणे जिल्हा : उत्तन, दिवाळे, बेलापट्टी, पाली, वाशी ब्रिज, सारसोळे.

Web Title: Fishermen pirates risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.