रत्नागिरीत पूर्णगड खाडीत मच्छीमारांची बोट उलटली; चार जण बुडाल्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 11:29 AM2017-09-12T11:29:39+5:302017-09-12T12:00:32+5:30
पूर्णगड खाडीमध्ये मच्छीमारांची बोट उलटल्याची घटना घडली आहे
रत्नागिरी, दि. 12- पूर्णगड खाडीमध्ये मच्छीमारांची बोट उलटल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार जण बुडाल्याची माहिती मिळते आहे. या चारमध्ये तीन सख्खे भाऊ असल्याचंही समजतं आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आले आहेत. तर इतर दोन जण अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. मंगळवारी पहाटे रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड खाडीमध्ये ही घटना घडली आहे. हसन पठाण आणि जैनुद्दिन पठाण अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत
सागरी महामार्गावरील पूर्णगड येथील जैनुद्दिन लतिफ पठाण, अब्बास लतिफ पठाण, हसन लतिफ पठाण आणि तौकर अब्दुल सत्तार हे चारजण सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मासेमारीसाठी गेले. सायंकाळपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे समुद्र खवळला होता. वाऱ्याचा वेगही वाढला होता. मंगळवारी पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची नौका उलटली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
मासेमारी करणाऱ्या अन्य काही बोटींच्या माध्यमातून पठाण यांची बोट बुडाल्याची माहिती बाहेर आली आणि शोधकामाला सुरूवात झाली. बुडालेल्या चौघांपैकी हसन लतिफ पठाण याचा मृतदेह सापडला आहे. उर्वरित तिघेजण अजूनही बेपत्ता आहेत. स्थानिक लोकांसह पोलीस बुडालेल्यांचा शोध घेत आहेत.
वैभववाडी तालुक्यात चक्रीवादळाने दाणादाण; लाखोंचे नुकसान
मुसळधार पावसाचा प्रत्यय कोकण किनारपट्टीमध्ये सगळीकडे आला आहे. रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, वैभववाडी आदी परीसरातही पावसाने थैमान घातले आहे. तालुक्यात रविवारी सायंकाळी मुसळधार पाउस झाला. यावेळी चक्रीवादळाने नापणे, नाधवडे तिथवली परिसरात अक्षरश: दाणादाण उडवली. चक्रीवादळामुळे घरे, गोठे व मंदिराचे सुमारे दहा लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे कोसळल्याने संपूर्ण तालुक्याचा विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. तर तळेरे-वैभववाडी मार्गावर झाडे कोसळल्याने काही काळ एकेरी वाहतूक सुरु होती.
रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पाऊस सुरु असतानाच जोरदार चक्रीवादळ झाले. चक्रीवादळाच्या तडाख्याने झाड पडल्यामुळे नापणे येथील भवानी मंदिराचा कळस तुटून स्लॅबही कोसळला. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.