मासेमारी बंदर समस्यांच्या जाळ्यात

By Admin | Published: February 23, 2015 09:45 PM2015-02-23T21:45:08+5:302015-02-24T00:02:37+5:30

बुरोंडी बंदर : जेटीचा अभाव, मागणी करुनही बंदर खात्याचे दुर्लक्ष

The fishing harbor gets into trouble | मासेमारी बंदर समस्यांच्या जाळ्यात

मासेमारी बंदर समस्यांच्या जाळ्यात

googlenewsNext

दापोली : दापोली तालुक्यातील बुरोंडी बंदर हे पारंपरिक पध्दतीने मासेमारी करणारे बंदर आहे. या बंदरात ताजे मासे मिळतात. नेहमी ताजे मासे मिळण्याचे बंदर अशीच बुरोंडी बंदराची जिल्ह्यात खास ओळख आहे. या बंदरात सुमारे २०० बोटी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतात. गेल्या अनेक वर्षांपासून येथील मच्छिमार विविध समस्यांना तोंड देत आहेत.जिल्ह्यातील सर्वांत जुने बंदर म्हणून बुरोंडीची ओळख आहे. या बंदरात बुरोंडी परिसरातील सुमारे २००पेक्षा अधिक बोटी पारंपरिक पद्धतीने मासेमारीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. बुरोंडी बंदरात लिलाव पद्धत नसल्याने पकडलेली मच्छी विक्रीसाठी हर्णै बंदरात घेऊन जावे लागते. बुरोंडी बंदरातील मासे हर्णै बंदरात घेऊन गेल्यावर तेथे योग्य दर मिळतोच, असे नाही. बऱ्याच वेळा बुरोंडी येथून हर्णै येथे वाहतूक करून नेण्याचा खर्चही सुटन नाही, अशी स्थिती होते. कारण बुरोंडी बंदरातील मासे हर्णै बंदरात पोहोचवण्यासाठी लागणारा वेळ, उपलब्ध होणारी वाहन व्यवस्था यावर दराचे गणित अवलंबून असते.
बुरोंडी बंदरात नेहमीच ताजे मासे मिळतात. या बंदरातील मासेमारीची उलाढाल केवळ एक दिवसापुरतीच असते. पहाटे ४ वाजता समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट सकाळी ९ ते १० वाजता मासेमारी करुन परत बंदरात येते. १० ते ११ वाजता मासेमारीसाठी गेलेल्या बोटी पुन्हा ३ ते ४ वाजता मासेमारी करुन परत येतात. त्यामुळे बुरोंडी बंदरातील मासे बर्फात ठेवलेले मासे नसतात. एका दिवसात केलेली मासेमारी आता इतर बंदरात पाहायला मिळत नाही. बुरोंडी बंदरात डोमा, मांदेली, बघा, कांटा, बिल्जे, बांगडा, बोंबिल, कोळंबीसारखे छोटे-छोटे इत्यादी दर्जेदार आणि चविष्ट मासे मिळतात. या बंदरात मोठे मासे मारले जात नाहीत. छोटे व ताजे मासे मिळण्याचे बंदर अशी ख्याती आजही या बंदराने जपली आहे.
गेली अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या या बुरोंडी बंदरात किमान प्राथमिक सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष झाल्याने या बंदरातील मच्छिमार बांधवांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मासेमारी झाल्यानंतर बोटीला ओढत किनाऱ्यावर आणावे लागते. त्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासते. बुरोंडी बंदरात मच्छी खरेदी-विक्रीचे सेंटर नाही. या बंदरातील दुरवस्था पाहून व्यापारी मंडळी या बंदरात यायला तयार होत नाहीत. बर्फ आणि कोल्ड स्टोअरेजची कोणतीही सुविधा नसल्याने मोठे महागडे मासे मारता येत नाहीत. जादा दर मिळवून देणारे मासे मारण्यासाठी हर्णै बंदरात जावे लागते.
समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास बोटी सुरक्षित ठिकाणी लावण्यासाठी जागा नसल्याने अनेकवेळा समुद्रातील वादळाचा फटका बसून बोटी खडकाळ दगडावर आदळून फुटतात. वादळी परिस्थितीमुळे अनेकवेळा मासेमारी बोटीला जलसमाधी मिळण्याची भीती असते. फयानमध्ये बंदरात एकाच कुटुंबातील तीन जणांचा बळी गेला होता.(प्रतिनिधी)

बुरोंडी बंदरात जेटी झाल्यास परकीय चलन मिळवून देणारे पापलेट, सुरमई, प्राँझ आदी चविष्ट मासे पकडता येतील. तसेच शीतगृह झाल्यास माशांना योग्य भाव मिळेपर्यंत मासे साठवून ठेवणे शक्य होईल. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. मासे विक्री करणाऱ्या स्थानिक महिलांची होणारी गैरसोयही दूर होईल. बुरोंडी बंदरातील समस्येवर मासेमारी जेटी उभारणे, हाच उपाय आहे. जेटी झाल्यास सर्व समस्या सुटतील आणि मच्छिमारांचे जीवनमान उंचावेल.
- महादेव शिरगावकर

वारंवार मागणी करुनसुद्धा येथे जेटी झालेली नाही. हर्णैला मासेविक्रीसाठी जावे लागते. मासेविक्रीसाठी दापोली मच्छी मार्के टला जाऊन किंवा डोईवर मांशाची टोपली घेऊन स्थानिक महिलांना घरोघरी फिरावे लागते. डोईवरील माशांचा टोपला अजून उतरलेला नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी जेटी होणे गरजेचे आहे. बुरोंडी बंदरात मासे खरेदीसाठी व्यापारी येत नाहीत. हर्णैप्रमाणे मच्छिचा लिलाव होत नाही. त्यामुळे मच्छिमारांचे नुकसान होत आहे.
- धर्मा पावसे, मच्छिमार

वादळाचा जास्त धोका
बुरोंडी बंदराला दरवर्षी वादळाचा सर्वाधिक फटका बसतो. बुरोंडीच्या समुद्र किनाऱ्यावरील घरांना यापूर्वी दरवर्षी पावसाळ्यात समुद्राच्या उधाणाचा धोका जाणवत होता. परंतु या बंदरातील समुद्र किनाऱ्यावर संरक्षक भिंत घालण्यात आल्याने किनाऱ्यावरील घरांना समुद्री वादळापासून उद्भवणारा धोका आता तात्पुरता टळला आहे.


बुरोंडी बंदर समस्यांच्या गर्तेत...
मच्छिमारांप्रमाणे मासेविक्री करणाऱ्या महिलांचे होतात हाल.
उन्हात उघड्यावर बसून मासे विकावे लागतात.
परकीय चलन मिळवून देणारे मासे कोल्ड स्टोअरेजअभावी द्यावे लागतात कवडीमोल किमतीला.
बुरोंडी बंदरात मासे विक्रीची सुविधा नसल्याने विक्रीसाठी गाठावे लागते हर्णै बंदर.
प्राथमिक सुविधांचीही वानवा असल्याने होतात हाल.
बुरोंडी हे बंदरविकासाचे केंद्र ठरू शकते

दलाल सांगेल ती किंमत
बुरोंडी बंदरात बर्फ मिळत नाही. कोल्ड स्टोअरेज नाही. या बंदरात कोल्ड स्टोअरेज नसल्याने व्यापारी अनेक वेळा दर पाडून मागतात. यामध्ये मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. बुरोंडी बंदरात बऱ्याचदा बर्फ उपलब्ध नसतो. त्यामुळे मच्छी खराब होण्याच्या भीतीने दलाल सांगले त्या कमी दरात मासे विकण्याची वेळ मच्छिमार बांधवांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मच्छिमारांच्या हाती फारसे काही मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मच्छीमार्के ट नाही
या बंदरात मिळणारे ताजे मासे विक्रीसाठी मार्के ट उपलब्ध नाही. बंदरातील ताजे मासे विक्रीसाठी बुरोंडीतील मच्छिमार महिला दुर्गंधीच्या ठिकाणी उन्हात उघड्यावर बसून मासे विक्री करतात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी येथे मच्छी मार्के टची आवश्यकता आहे. बुरोंडी बंदरात पिण्याचे पाणी, शौचालय, मच्छी विक्रीसाठी ओटे यांची आवश्यकता आहे. मासेमारी झाल्यानंतर बोटी बंदरात येण्यासाठी जेटी होणे आवश्यक आहे. बंदरात मिळणारे ताजे मासे सध्या विक्रीसाठी उपलब्ध नसल्याने येथे अनेकांची गैरसोय होत आहे. ती दूर होण्यासाठी प्रयत्न कधी करणार असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: The fishing harbor gets into trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.