रायगड जिल्ह्यातील तरुणांसाठी फिटनेस मंत्रा
By admin | Published: August 26, 2016 02:29 AM2016-08-26T02:29:37+5:302016-08-26T02:29:37+5:30
पिळदार शरीरयष्ठीचे स्टार्स पाहिले की, तरुण शारीरिक फिटनेसबाबत अत्यंत जागरूक राहण्याचा प्रयत्न करतात
आविष्कार देसाई,
अलिबाग- पिळदार शरीरयष्ठीचे स्टार्स पाहिले की, तरुण शारीरिक फिटनेसबाबत अत्यंत जागरूक राहण्याचा प्रयत्न करतात, मात्र फिटनेस राखण्यासाठी त्यांना खासगी व्यायामशाळेचा (जीम) आधार घ्यावा लागतो. महागाईच्या काळात सर्वसामान्यांना खासगी ट्रेनर अथवा महागड्या जीममध्ये जाता येत नाही. यावर उपाय म्हणून जिल्ह्यात जीम उभारण्यात येणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ९१ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
विविध स्टार्सच्या चांगल्या वाईटाचा प्रभाव तरुणाईवर पडत असतो. त्या स्टार्ससारखी आपलीही बॉडी व्हावी, यासाठी सध्या जीममध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे आपल्याला जीमच्या संख्येवरुन लगेचच लक्षात येईल. सार्वजनिक जीममध्ये मोठ्या संख्येने गर्दी असते. त्यामुळे व्यायाम करण्यासाठी पाहिजे तेवढा वेळ तरुणांना मिळत नाही, तर दुसरीकडे खासगी जीममधील फी परवडत नाही. त्यामुळे अशा फिटनेसप्रेमींचे हाल होतात. तरुण पिढी सुदृढ राहिली पाहिजे यासाठी व्यायामशाळा उभारण्यासाठी आणि साहित्य खरेदीसाठी सरकारकडून अनुदान देण्यात येते.
२०१६-१७ अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ९१ लाख रुपयांचे अनुदान व्यायामशाळा उभारण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सचिव शीतल तेली-उगले यांनी १९ आॅगस्टच्या पत्राने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील विविध १३ शाळा आणि संस्थांना व्यायामशाळा बांधण्यासाठी प्रत्येकी सात लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आधुनिक जीम उभारले जाणार असल्याने फिटनेसप्रेमींना कमी खर्चामध्ये आपापला फिटनेस ठेवता येणार आहे.
>जिल्हा नियोजन समितीने ९१ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाबाबत जागृती करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील विविध शाळांनीही अनुदानासाठी अर्ज करावेत. पुढच्या टप्प्यात त्यांनाही मंजुरी देण्यात येईल.
- महादेव कसगावडे,
जिल्हा क्रीडा अधिकारी