फितूर होताहेत साक्षीदार
By admin | Published: August 4, 2014 12:59 AM2014-08-04T00:59:06+5:302014-08-04T00:59:06+5:30
खुनासारख्या गंभीर प्रकरणात भीती आणि पैशाच्या प्रलोभनातून साक्षीदार फितूर होण्याचे प्रमाण सतत वाढत असल्याने आरोपींची सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ मिळून निर्दोष सुटका होत आहे.
कसा मिळेल न्याय ? : साक्षीदार संरक्षण कायद्याची गरज
राहुल अवसरे - नागपूर
खुनासारख्या गंभीर प्रकरणात भीती आणि पैशाच्या प्रलोभनातून साक्षीदार फितूर होण्याचे प्रमाण सतत वाढत असल्याने आरोपींची सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ मिळून निर्दोष सुटका होत आहे. परिणामी गुन्हेगारांच्या गुन्हेगारी वृत्तीला चालना मिळून समाजातील असुरक्षिततेची भावना कायम राहत आहे. केवळ भीतीमुळे साक्षीदार फितूर होण्याचे प्रमाण अधिक असल्याने संरक्षणासाठी ठोस कायदा असण्याची गरज व्यक्त होत आहे.
चालू वर्षी मे महिन्याच्या अखेरपर्यंत खुनाचे एकूण ३५ खटले चालले. त्यापैकी २५ प्रकरणातील आरोपी सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटले तर १० प्रकरणातील १६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. खून खटल्यांमधील शिक्षेचे हे प्रमाण केवळ २८.५७ टक्के आहे. साक्षीदार फितूर होणे, पोलीस तपासातील उणिवा आणि सरकार पक्षाचे कमकुवत सादरीकरण या तीन कारणांमुळे आरोपी निर्दोष ठरत आहेत.
ज्या प्रकरणांमध्ये साक्षीदार फितूर होण्याची शक्यता अधिक असते अशा प्रकरणांचा तपास बौद्धिक आणि तांत्रिकदृष्ट्या करून जास्तीत जास्त परिस्थितीजन्य पुरावे गोळा केली जाऊ शकतात. प्रत्यक्षदर्शी आणि महत्त्वाचे साक्षीदार फितूर होऊनही केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे.
गॅलेक्सीनंतर सेव्हन हिल्स
सध्या न्यायालयात ‘सेव्हन हिल्स बार लाईव्ह मर्डर’ खटला सुरू आहे. या खटल्यातील प्रत्यक्षदर्शी आणि फिर्यादी साक्षीदार बारचा व्यवस्थापक तसेच वेटर साक्ष देताना फितूर झाले आहे. सेव्हन हिल्स बारमध्ये खून होतानाचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झालेले असून याबाबतचे फुटेज संपूर्ण देशाने इंटरनेटवर पाहिले आहे. खापरखेडा येथील वेकोलि सुरक्षा जवानाच्या खुनात खुद्द मृताची पत्नी आणि मुलगी फितूर झाल्याने आरोपी निर्दोष सुटला. सक्करदरा येथील मोठ्या भावाच्या खुनात साक्ष देताना लहान भाऊ फितूर झाला. मेडिकल कॉलेज चौकातील गॅलेक्सी बारचा मालक प्रदीप भोयर याच्या खुनातील फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार एक सुरक्षा जवान अखेरपर्यंत न्यायालयात साक्ष देण्यास आलाच नाही. त्यामुळे या खुनातील सर्वच आरोपी मोकाट झाले. ‘नागपुरी दादा’ भरत मोहाडीकर याच्या खुनातील सर्वच आरोपी साक्षीदारांच्या फितुरीमुळे निर्दोष सुटले.
साक्षीदार संरक्षणाचा अभाव
एक जन्मठेप ही भविष्यातील संभाव्य किमान दहा खुनाच्या घटना राखू शकते. त्यामुळे पोलिसांनी शिक्षा होण्यावर अधिक भर दिला पाहिजे. समाजाला गंभीर धोका निर्माण होईल, अशा आरोपींचा जामीन रोखला पाहिजे. भविष्यात साक्षीदारांना धोका निर्माण होणारी प्रकरणे शोधून पोलिसांनी अशा साक्षीदारांना स्वत:हून संरक्षण दिले पाहिजे. शहरात पेट्रोलिंग करीत फिरणाऱ्या चार्ली कमांडोजवर संबंधित साक्षीदारांच्या घरांना भेटी देण्याची,त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याची सक्ती केली पाहिजे. भयग्रस्त साक्षीदारांना संरक्षण दिले पाहिजे.
आरोपींना दिसू नये साक्षीदार
न्यायालयात साक्ष देण्यासाठी येणारा साक्षीदार हा भयग्रस्त असतो. अशा वेळी साक्ष देणारा साक्षीदार हा आरोपींना दिसणार नाही, अशी व्यवस्था केली पाहिजे. काहीसे मोक्काच्या धर्तीवर आरोपींना संरक्षण दिले जावे. मोक्काच्या खटल्यात साक्षीदारांची ओळख गुप्त ठेवली जाते. प्रत्येकाला सांकेतिक क्रमांक दिला जातो. जीवाला भीत असल्याने काही महत्त्वांचे साक्षीदार न्यायालयात साक्षी देण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे निकाल आरोपींचा बाजूने लागून ते निर्दोष सुटतात. अशा वेळी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ ने अशी साक्ष तपासली जावी, यासाठी खटला चालणाऱ्या न्यायालयात कॉन्फरन्सिंगची व्यवस्था केली पाहिजे.
अन् मिळतो ५० रुपये भत्ता
न्यायालयात साक्ष देण्यासाठी येणाऱ्या साक्षीदाराला वर्षानुवर्षे केवळ ५० रुपये भत्ता दिला जातो. साक्ष झाली तरच हा भत्ता दिला जातो. तोही ताबडतोब मिळत नाही. कधी-कधी साक्ष देणाऱ्याचा अख्खा दिवस न्यायालयात जातो. शासनाने साक्षीदाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
‘पर्ज्युरी केसेस’ची गरज
प्रत्यक्ष न्यायालयात साक्ष देताना पोलीस, विशेष कार्यकारी दंडाधिकारी किंवा न्यायदंडाधिकाऱ्याला दिलेल्या मूळ बयानापासून ढळणे याला साक्ष उलटणे, असे म्हटले जाते.
फितूर झालेल्या अशा साक्षीदारांविरुद्ध पर्ज्युरीच्या केसेस चालविण्याचे कायद्यात प्रावधान आहे. याला सार्वजनिक न्यायविरोधी अपराध म्हटले जाते. यासाठी सरकारी वकिलांनी पुढाकार घ्यायला पाहिजे.