खारघर येथे पत्रकारावर हल्ल्याप्रकरणी पाच अटकेत
By admin | Published: April 3, 2017 02:43 AM2017-04-03T02:43:27+5:302017-04-03T02:43:27+5:30
खारघर येथे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
नवी मुंबई : खारघर येथे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यात भाजपा आमदाराच्या चुलत भावाचाही समावेश असून सोसायटीच्या वादातून त्यांनी हल्ला केल्याचे उघड झाले आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्हीमधून गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा उलगडा केला आहे.
शुक्रवारी खारघर येथे पत्रकार सुधीर सूर्यवंशी व त्यांचे मित्र संतोष फतारे यांच्यावर हल्ल्याची घटना घडली होती. अज्ञात चौघांनी त्यांची अडवणूक करून जबर मारहाण केली होती. मारेकऱ्यांनी तोंडावर रुमाल बांधलेले असल्यामुळे त्यांची ओळख पटलेली नव्हती. दरम्यान, सूर्यवंशी यांनी काही जणांवर संशयदेखील व्यक्त केला होता, परंतु पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले असता हल्ल्यात त्यांचा समावेश नसल्याचे समोर आले. त्यामुळे या हल्ल्यामागे नेमका हात कोणाचा, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. त्याकरिता आयुक्त हेमंत नगराळे, उपआयुक्त दिलीप सावंत, सहायक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी व कक्ष दोनचे वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासादरम्यान सूर्यवंशी राहत असलेल्या कल्पतरू सोसायटी ते घटनास्थळ दरम्यानचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले असता, काही जण त्यांचा पाठलाग करत असल्याचे त्यात दिसले. त्यापैकी एका बॉडीबिल्डरचे छायाचित्र काढून पोलिसांनी पनवेलमधील जिममध्ये चौकशी केली असता, मारेकऱ्यांची माहिती मिळाली. त्यानुसार घटनेच्या चोवीस तासांच्या आत पोलिसांनी एकाला पेणमधून तर चौघांना लोणावळा येथून अटक केली. मयूर कृष्णा ठाकूर (३0), आकाश कृष्णा पाटील (२४), अशोक जगन्नाथ भोईर (३0), विश्वास आत्माराम कथारा (३0), अनंता तुकाराम कथारा (२६) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी मयूर हा भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांचा चुलत भाऊ आहे, परंतु या हल्ल्यामागे राजकीय कारण नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मयूर हा सूर्यवंशी यांचा शेजारी असून त्यांच्यात सतत भांडण होत होते. काही दिवसांपूर्वी सोसायटीमध्ये भाजपाची पत्रके वाटताना सूर्यवंशी यांनी विरोध केल्यानेदेखील त्यांच्यात वाद झाला होता. याच कारणातून त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा सूर्यवंशी यांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)