पुण्यात दर दहा लाखांमागे साडेपाच हजार तपासण्या; मृत्यूदर अद्यापही पाच टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 07:52 PM2020-05-29T19:52:07+5:302020-05-29T20:00:58+5:30
राज्यात सर्वाधिक चाचण्या मुंबईमध्ये होत असून त्याखालोखाल पुण्याचा क्रमांक आहे.
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पालिकेने नागरिकांच्या तपासणीवर भर दिला असून दिवसाकाठी एक ते दीड हजाराच्या दरम्यान 'स्वॅब' टेस्टिंग केले जात आहे. पुण्यात दर दहा लाख लोकांमागे ५ हजार ७५३ तपासण्या होत असून रुग्ण निदानाचे प्रमाण ८ टक्के आहे. राज्यात सर्वाधिक चाचण्या मुंबईमध्ये होत असून त्याखालोखाल पुण्याचा क्रमांक आहे.
शहरातील रुग्ण संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. सुरुवातीच्या काळात कोरोना तपासण्यांचे प्रमाण अत्यंत जुजबी होते. हे प्रमाण वाढवत नेण्यात आले. त्यानंतर, शहरातील अतिसंक्रमित भाग आणि अन्य असे दोन भाग करण्यात आले. कंटेन्मेंट भागासह सर्वाधिक रुग्ण असलेल्या भागामध्ये कोरोना तपासण्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आली. त्यामुळे पालिका दरदिवशी शेकड्यात करीत असलेल्या चाचण्यांचा आकडा हजाराच्या पुढे गेला आहे.
राज्यात सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबईमध्ये दर दहा लाख लोकसंख्येमागे ७ हजार ९७ जणांची तपासणी केली जात असून रुग्ण निदानाचे प्रमाण 23 टक्के आहे. तर, ठाण्यात ६ हजार ९३९ रुग्ण असून दर दहा लाखांमागे ३ हजार १४१ तपासण्या केल्या जात आहेत. ठाण्याचे रुग्ण निदानाचे प्रमाण १८ टक्के आहे. मुंबईतील मृत्यूचे प्रमाण ३ आणि ठाण्यातील १ टक्के आहे. पुण्याचे मात्र पाच टक्के असून हे प्रमाण आणखी खाली आणण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. राज्यात सर्वाधिक मृत्यूदर हा जळगाव (११ टक्के) आहे.
======
पुण्यातील रुग्णसंख्या ५ हजार ८१५ झाली असून आतापर्यंत ३ हजार २६४ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ५५ टक्क्यांवर गेले आहे. तर, प्रत्यक्षात अॅक्टीव्ह रुग्ण २ हजार २९४ झाले आहेत. हे प्रमाण एकूण रुग्ण संख्येच्या ४० टक्के आहे. तर मृत्यूंचे प्रमाण पाच टक्क्यांवर आहे.
======
शहर/जिल्हा एकूण रुग्ण एक्टिव्ह केसेस मृत्यू तपासण्या निदान टक्केवारी
मुंबई ३२, ०३३ २३, ५११ १,०२६ ७,०९७ २३
ठाणे ६,९३९ ४,९१६ ९४ ३,१४१ १८
पुणे ४,९९८ २,१५६ २७४ ५,७५३ ०८
पालघर ७६३ ४९१ ८ १, १६८ २०
औरंगाबाद १,१९० ४५१ ४८ २,४६२ १२
सोलापूर ५६६ २९४ ४२ १,२८५ ०९
कोल्हापुर २६९ २५३ ० १ २,३०० ०३
रायगड ७१९ २२३ १८ १,९४४ १३
अकोला ४२६ २२३ १४ २,०६६ १०
जळगाव ३७९ १८० ४२ १,११९ ०७