पाच बोगस डॉक्टरांना ठोकल्या बेड्या

By admin | Published: January 28, 2016 02:08 AM2016-01-28T02:08:01+5:302016-01-28T02:08:01+5:30

कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना, राजरोसपणे वैद्यकीय व्यवसाय करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध मुंबई पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत

Five bogus doctors detained | पाच बोगस डॉक्टरांना ठोकल्या बेड्या

पाच बोगस डॉक्टरांना ठोकल्या बेड्या

Next

मुंबई: कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना, राजरोसपणे वैद्यकीय व्यवसाय करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध मुंबई पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत बुधवारी बोरीवली व मालाड परिसरात पाच बोगस डॉक्टर्सना बेड्या ठोकण्यात आल्या. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या डॉक्टरांविरुद्ध ‘लोकमत’नेदेखील वेळोवेळी आवाज उठविला आहे. अखेर मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिका प्रशासनाने कारवाई केली आहे. बोगस
डॉक्टरांविरुद्ध कारवाईसाठी नऊ पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
शिवधनी बसू सरोज, ऋषिकेश भगवान विश्वकर्मा, राम अखपाल यादव, रघुनाथ पुलीन अधिकारी व मुलचंद मनुलाल शिवर्ते अशी अटक केलेल्या बोगस डॉक्टर्सची नावे आहेत. ही मोहीम सुरू राहणार असे उपायुक्त प्रवीण पडवळ यांनी सांगितले.
शहर व उपनगरात बोगस डॉक्टरांचे पेव फुटल्याने, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. वैद्यकीय व्यवसायाबाबत आवश्यक शैक्षणिक अर्हता नसल्याने, त्यांच्याकडून दिली जाणारी औषधे रुग्णांसाठी धोकादायक ठरत आहेत. त्याबाबत ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठविला होता. त्यानंतर शासनाने पोलीस व महापालिकेने समन्वय साधून कारवाईसाठी सर्वसमावेशक समिती स्थापण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यानुसार मुंबई पोलिसांनी नऊ पथकांची स्थापना केली आहे. सहायक आयुक्त अशोक जाधव, निरीक्षक राजेंद्र मोहिते व सहायक निरीक्षक संजय खेडकर यांनी नियोजन करून बुधवारी बोरीवली (प) येथील लिंक रोड येथील शिवधनी बसू सरोज, ऋषिकेश भगवान विश्वकर्मा, राम अखपाल यादव व मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरातील रघुनाथ अधिकारी व मुलचंद शिवर्ते यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली. दोन्ही कारवाईबाबत अनुक्रमे बोरीवलीतील एमएचबी पोलीस ठाणे व दिंडोशीतील कुरार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

अन्य विभागातील
अधिकारीही सामील
बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाईसाठी स्थापन केलेल्या प्रत्येक पथकामध्ये पोलीस व
महसूल विभागाचा एक अधिकारी, तसेच एक डॉक्टर व एका हवालदाराचा समावेश आहे. अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४१९, ४२० सह
कलम ३३,३६ आणि महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अ‍ॅक्ट-१९६१ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Web Title: Five bogus doctors detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.