‘प्रधानमंत्री आवास’मध्ये पाच ब्रास वाळू मोफत देणार; मुख्यमंत्र्यांची ‘लोकसंवाद’मध्ये घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 01:07 AM2019-01-03T01:07:46+5:302019-01-03T01:07:57+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लोकसंवाद कार्यक्रमात केली.
मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लोकसंवाद कार्यक्रमात केली.
शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणांची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारपासून लोकसंवाद कार्यक्रमाद्वारे लाभार्थ्यांशी संवाद सुरू केला. या कार्याक्रमाच्या पहिल्या भागात बुधवारी राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना तसेच रमाई आवास, शबरी घरकुल, पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेच्या चांदा ते बांदापर्यंतच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या लाभार्थ्यांबरोबरच विविध आवास योजनेतून बांधलेल्या घरातील प्रत्यक्ष लाभार्थ्यांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्र्थींनी सरकारचे यावेळी आभार मानले.
वर्धा येथील आरती कोट्टेवार व गडचिरोली जिल्ह्यातील फुलेवाडा येथील जावेद शेख यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधताना रेती मिळण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यावर फडणवीस यांनी ५ ब्रासपर्यंत रेती मोफत देण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत सहा हजार घरांचे बांधकाम पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.
आराखड्याच्या शुल्कमाफीसाठी केंद्राशी चर्चा सुरू
या योजनेतील घरांच्या आराखड्यासाठी घेण्यात येणारे शुल्क माफ करण्यासंदर्भात केंद्र शासनाशी चर्चा सुरू असून लवकरच त्याबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे अमरावतीतील आशा जामजोड यांच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले.
इचलकरंजी येथील ज्योत्स्ना दशरथ घोडके म्हणाल्या, माझे कच्चे घर होते. घरकूल मंजूर झाल्याने ‘देवेंद्रच्या रुपात देव’ भेटल्याचा आनंद झाला. घरामुळे मुलीचे बाळंतपण सुखरुप झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.