पाच वर्षांत पाच मुलांचे जन्म!
By admin | Published: June 30, 2017 02:49 AM2017-06-30T02:49:55+5:302017-06-30T02:49:55+5:30
ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकात होणाऱ्या प्रसूतीनेही आगळा वेगळा इतिहास रचला असून, गेल्या पाच वर्षांत वेगवेगळ्या फलाटांवर
पंकज रोडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकात होणाऱ्या प्रसूतीनेही आगळा वेगळा इतिहास रचला असून, गेल्या पाच वर्षांत वेगवेगळ्या फलाटांवर प्रतीवर्षी एका बालकाचा जन्म झाला आहे. पाच वर्षांत ठाणे स्टेशन पाच बालकांचे जन्मस्थान ठरले आहे.
रेल्वे स्थानकात मूल जन्माला आल्यास त्याला आयुष्यभर रेल्वेचा प्रवास मोफत असतो, ही अफवा असून, अशी कुठलीही सवलत दिली जात नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. फक्त बाळाचा जन्म झाल्यावर त्याला जन्म दाखला मिळावा, यासाठी रेल्वेकडून एक प्रमाणपत्र मिळते, अशी माहिती प्रशासनाने दिली.
बदलापूर येथे राहणाऱ्या मीनाक्षी जाधव यांची बुधवारी रात्री ठाण्याच्या फलाट क्रमांक १० वर प्रसूती झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सुदैव्याने त्यावेळी तेथे तैनात रेल्वे सुरक्षा बलाच्या हवालदार शोभा मोटे आणि प्रवाशांमुळे तिची सुखरुप सुटका झाली. याचदरम्यान, ठाणे रेल्वे स्थानकात किती बाळ जन्माला आले याबाबत विचारणा केल्यावर गेल्या पाच वर्षात पाच बालके जन्माला आल्याचे ठाणे रेल्वे प्रबंधक विभागाने सांगितले. दरवर्षी सरासरी एक बाळ जन्माला येते ही बाब पुढे आली.
गर्भवतीला रुग्णालयात घेऊन जाताना वेदना वाढल्यास त्यांची प्रसूती फलाटावर तातडीने करण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी रेल्वे प्रशासनाची तारंबळ उडते. महिला कर्मचारी, क्लार्क, महिला पोलीस यांच्या सहकार्याने जाणकार प्रवासी महिलांच्या मदतीने आतापर्यंतच्या सर्व प्रसूती सुखरुप झाल्या आहेत. यामध्ये फलाट क्रमांक २-३ आणि ४-५ व ६ (दोन) तसेच १० वर प्रसूती झाल्या.
पाच वर्षांपूर्वी एका महिलेचे माहेरी भांडण झाल्याने ती सासरी जाताना तिची स्थानकात प्रसूती झाली. आतापर्यंत जन्माला आलेल्या बालकांमध्ये एका मुलीचा आणि चार मुलांचा समावेश आहे.