लोकसहभागातून पाच वसाहती हिरव्यागार
By admin | Published: July 4, 2016 04:26 AM2016-07-04T04:26:06+5:302016-07-04T04:26:06+5:30
वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळल्याचे लक्षात घेत परभणी शहरातील एका वृक्षप्रेमीने लोकसहभागातून वृक्ष लागवड व संवर्धनाचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
राजन मंगरूळकर,
परभणी- वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळल्याचे लक्षात घेत परभणी शहरातील एका वृक्षप्रेमीने लोकसहभागातून वृक्ष लागवड व संवर्धनाचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
कृषी विभागात मंडळ कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कैलास सोनाजी गायकवाड यांनी शहरातील गजानननगर, दत्तनगर, समझोतानगर, श्रीरामनगर, तुळजाभवानीनगर आदी भागांमध्ये नागरिकांच्या सहकार्याने वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला. २००८पासून या भागामध्ये आतापर्यंत १० हजारहून अधिक झाडांची लागवड गायकवाड यांनी केली आहे.
यामध्ये प्रामुख्याने करंजी, गुलमोहर, अशोका या तीन प्रकारच्या झाडांचा समावेश
आहे.
या वसाहतींमध्ये यापूर्वी बोटावर मोजण्याइतकी झाडे असल्याने वाढत्या तापमानाचा त्रास या भागातील रहिवाशांना सहन करावा लागत होता. ही बाब ओळखून कैलास गायकवाड यांनी नागरिकांना सोबत घेऊन प्रत्येक घरासमोर दोन झाडे लावण्यास सुरुवात केली.
या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी झाडे लावलेल्या संबंधित घरमालकांनी घेतली. त्यामुळे या भागातील तापमानात बरीच घट झाली आहे.
>१२५ बोधीवृक्ष संवर्धनाचा मानस
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त कैलास गायकवाड, त्यांच्या पत्नी वंदना यांनी परभणी शहरातील मोकळ्या जागा, मंदिर, बुद्धविहार आदी ठिकाणी वर्षभरात १२५ बोधीवृक्ष संवर्धन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
जनजागृतीबद्दल प्रशासनाचे पुरस्कार
कैलास गायकवाड यांनी मंडळ कृषी अधिकारी म्हणून काम करताना विविध ठिकाणी वृक्ष लागवड, संवर्धनाची मोहीम राबविली. याबद्दल नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीची जनजागृती केल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने २००३पासून २०१४पर्यंत विविध विभागांनी त्यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला आहे.
पुढील काळातही वृक्ष लागवडीचे उपक्रम हाती घेऊन सातत्य चालूच ठेवणार आहे. वृक्ष लागवडीच्या माझ्या मोहिमेची माहिती अनेकांना कळाल्यावर गंगाखेड तालुक्यातील हरंगुळ येथील किसान रोपवाटिकेने २ हजार रोपे मोफत लावण्यासाठी दिली होती. यासह पोखर्णी देवी येथील जगदंबा रोपवाटिकेनेही रोपांची मदत केली.
- कैलास गायकवाड, वृक्षप्रेमी