पाच डब्यांची डबलडेकर फायदेशीर
By admin | Published: May 12, 2015 09:31 PM2015-05-12T21:31:04+5:302015-05-13T00:56:24+5:30
कोकण रेल्वे : पर्यटकांना फायदेशीर ठरेल, मध्यप्रदेशमध्ये गाडी चालते मग येथे का नको?
चिपळूण : भोपाळ ते इंदोर दरम्यान धावणाऱ्या तीन डब्यांच्या डबलडेकर वातानुकुलित गाडीप्रमाणे मुंबई-मडगाव मार्गावर पाच डब्यांची वातानुकुलित डबलडेकर गाडी सुरु करावी, अशी मागणी हिरालाल मेहता यांनी केली आहे.
कोकणातील निसर्गसौंदर्यांची भुरळ पर्यटकांना पडावी व मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणात यावेत. गोव्याप्रमाणे पर्यटनावर येथील आर्थिक सुबत्ता यावी. या हेतूने कोकण रेल्वे प्रशासनाने मुंबई ते मडगाव अशी वातानुकुलित दहा डब्यांची डबलडेकर गणेशोत्सव व दीपावलीच्या काळात सुरु केली होती. परंतु, या गाडीचे भाडे सर्वसामान्य प्रवाशाला परवडणारे नव्हते. शिवाय ही गाडी दहा डब्यांची असल्याने पुरेसे भारमान या गाडीला मिळाले नाही. कमी भारमानामुळे अखेर ती बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.
कोकणातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद देशभरातील व परदेशातील पर्यटकांना लुटता यावा, यासाठी भोपाळ ते इंदोर व्हाया उज्जैन या गाडी क्र. २२१८५/८६ या तीन डब्यांच्या गाडीच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई ते मडगाव अशी सकाळी ९ वाजता व वसई ते मडगाव अशी रात्री ९ वाजता अशी दोन वेळा पाच-पाच डब्याची गाडी सोडल्यास पर्यटकांना त्याचा लाभ घेता येईल. ही गाडी सुरु झाल्यास ज्या ज्या स्थानकावर तिला थांबा दिला जाईल, त्या त्या थांब्यावर गाड्या येण्यापूर्वी दोन तास अगोदर तिकीट मिळावे. मध्यप्रदेशमधील भोपाळ ते इंदोर अशीे तीन डबे शिवाय गार्ड, इंजिन व जनरेटरसाठी स्वतंत्र डबे असणारी गाडी चालते. मग कोकण रेल्वे मार्गावर अशी गाडी का चालणार नाही, असा प्रश्न मेहता यांनी उपस्थित केला आहे.
पर्यटकांसाठी ही गाडी अधिक सोयीची ठरु शकते. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी ही गाडी सोयीची होणार असून ती सुरू झाल्यास त्याचा फायदा सर्व स्तरातील लोकांना होणार असल्याचे मेहता यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पर्यटकांच्या सुविधेत भर पडणार
मुंबई-मडगाव मार्गावर पाच डब्यांची वातानुकूलीत डबल डेकर गाडी सुरू झाल्यास त्यातून प्रवासीवर्गाची संख्या वाढेल व बाजारपेठांमधून असलेल्या व्यापारीवर्गालाही त्याचा लाभ घेता येईल. गोव्याप्रमाणे कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही वाढ होईल. त्यासाठी ही गाडी त्वरित सुरू करण्याची मागणी मेहता यांनी केली आहे. आरामदायी प्रवासासाठी योग्य ठरणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर याआधी सुरु केलेली १० डब्यांची डबलडेकर बंद.
नियोजनाचा अभाव व कमी भारमानाचा बसला फटका.
मध्यप्रदेशच्या धर्तीवर नवीन गाडी सुरु करण्याची मागणी.
कमी डब्यांच्या गाडीमुळे पर्यटकांना मिळेल सुविधा.
ार्वच स्थानकांवर गाडी येण्यापूर्वी दोनतास अगोदर तिकीट मिळावे