राज्यात पाच कोटींच्या बनावट नोटा चलनात, नवी मुंबईतून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 01:36 AM2018-09-02T01:36:44+5:302018-09-02T01:36:53+5:30
सांगली शहरात बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करताना सापडलेल्या टोळीने गेल्या दीड वर्षात दोन हजार रुपयाच्या बनावट नोटांच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपये चलनात आणल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीतून शनिवारी पुढे आली.
सांगली : सांगली शहरात बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करताना सापडलेल्या टोळीने गेल्या दीड वर्षात दोन हजार रुपयाच्या बनावट नोटांच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपये चलनात आणल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीतून शनिवारी पुढे आली. या प्रकरणी नवी मुंबईतून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनही दोन हजाराच्या ९२ नोटा जप्त केल्या आहेत. अटकेतील संशयितांची संख्या आता पाच झाली आहे.
सूरज उर्फ मनीष मल्ला ठाकुरी (वय ३६, रा. अर्जुनवाडी, घनसोली, नवी मुंबई) व जिलानी आश्पाक शेख (४७, शिव कॉलनी, गजानन मंदिरजवळ, नवी मुंबई) अशी नव्याने अटक केलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी राज राजकुमार उज्जेनवाल सिंह (२८) प्रेमविष्णू रोगा राफा (२६), नरेंद्र आशापाल ठाकूर (३३, कल्याण) या तिघांना अटक केली होती. हे तिघे व नव्याने अटक केलेला मनीष ठाकुरी २३ आॅगस्ट रोजी सांगलीत आले होते. मुख्य बसस्थानकाजवळील एका दुकानातून त्यांनी खाद्यपदार्थ खरेदी केले. यासाठी त्यांनी दोन हजाराची नोट दिली. दुकानात महिला होती. तिला नोटेविषयी शंका आल्याने तिने संशयितांना ‘नोट बनावट आहे की काय’ असा प्रश्न उपस्थित केला. त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला़
बनावट कागदपत्रे
अटकेतील संशयितांचे पाचही मोबाइल जप्त केले आहेत. याशिवाय प्रेमविष्णू राफा याची स्वत:च्या नावावरील तीन बनावट आधार कार्ड, तीन बनावट पॅन कार्ड, विविध बँकांची पाच एटीएम कार्ड जप्त केली आहेत. या सर्वांचे कोणकोणत्या बँकेत खाते आहे, याची माहिती काढण्याचे काम सुरूआहे.
नाशिकमध्ये गुन्हा
बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी जिलानी शेख याच्याविरुद्ध नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला दोन वर्षांपूर्वी अटकही झाली होती.