पाच धरणे उशाला, तरीही कोरड घशाला
By admin | Published: February 21, 2017 05:20 AM2017-02-21T05:20:46+5:302017-02-21T05:20:46+5:30
पाच मोठी धरणे उशाला असूनही मोखाडा तालुका तहानलेलाच आहे. निवडणुकीच्या काळात टॅँकर मुक्तीच्या आश्वासनांचा
रवींद्र साळवे / मोखाडा
पाच मोठी धरणे उशाला असूनही मोखाडा तालुका तहानलेलाच आहे. निवडणुकीच्या काळात टॅँकर मुक्तीच्या आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना पाणी प्रश्न सोडवण्याचा विसर पडला असल्याने स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट थांबलेली नाही.
लाखांच्या आसपास या तालुक्याची लोकसंख्या पोहचली असून दरवर्षी भीषण पाणीटंचाईच्या समस्येला मोखाडावासियांना सामोरे जावे लागते. परंतु येथील खोच, पळसपाडा, मारु तीची वाडी, कारेगाव, मोरहंडा अशी मोठी मोठी पाच धरणे उशाला असून कोरड मात्र घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी या ठिकाणी प्रचंड पाऊस होऊन देखील शून्य नियोजनामुळे दर उन्हाळ्यात पाणी टंचाई उग्ररुप धारण करीत असते यामुळे फक्त टँकर लॉबीला जगवण्याचे काम केले जाते. कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० किमी अंतरावर शासनाने पाणी पोहचवले आहे. परंतु धरणा लगतच्या ४ ते ५ किमी अंतरावरच्या गावांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते.
गेल्या वर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. मे-जून मध्ये टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या शंभरच्या घरात पोहचली होती. डिसेंबर उजेडताच मोखाड्यातील गावपाड्यांत पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी ४ प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाकडे येऊन ठेपले आहेत. दिवसेंदिवस टंचाई ग्रस्त गाव पाड्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनालाही तारेवरची करत करावी लागते. परंतु कायम स्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कुणीच प्रयत्न करीत नाहीत.
पालकमंत्री विष्णू सवरा कधी लक्ष घालणार?
विक्र मगड मतदारसंघाचे आमदार व राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी अनेकदा आपल्या भाषणातून टँकर मुक्तीचा नारा दिला आहे. परंतु आश्वासनेच देऊन चालणार नाही तर यासाठी पालकमंत्र्यांनी ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. ५ हजार कोटी पेक्षा अधिक बजेट असतांना देखील येथील मूलभूत प्रश्न सुटले जात नसतील तर येथील जनतेपुढे कपाळावर हात मारण्या पलिकडे काहीच पर्याय नाही हे सांगणे वावगे ठरणार नाही.
टँकरने पाणीपुरवठा करण्याची टंचाईग्रस्त गावपाड्यांची मागणी
दरवर्षी प्रमाणे यंदाही पाणी टंचाईने उग्ररूप धारण करण्यास सुरूवात केली असून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर येथील आदिवासी पाड्यांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे आतापासूनच या गाव-पाड्यांना टॅँकरने पाणी पुरवठा सुरु करावा, अशी मागणी सुरु झाली आहे.
मोखाडा तालुक्यात २५९ गावपाडे असून तालुक्यातील गोळीचा पाडा, धामोडी, पेंडक्याची ठवळ पाडा येथील गावपाड्यांना पाण्यासाठी मैलंमैल भटकं ती करावी लागत आहे. या भागात नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी मोखाडा पाणी पुरवठा विभागाकडे करण्यात आली असून अद्याप तरी त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही
दरवर्षीच येथील भूमीपुत्रांवर पाणी टंचाईचे संकट ओढावत असल्याने घोटभर पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागतात. टँकरच्या नावाखाली कोट्यवधीचा खर्च करणारे प्रशासन या ठिकाणी मुबलक पाणीसाठा असूनही नियोजन करत नाही. येथील पाणी समस्या कायमची सोडविण्या संदर्भात येथील खासदार, आमदारांना कोणतेही सोयर सुतक नसल्याचे दिसून येत आहे.