आरोपीच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ
By Admin | Published: July 23, 2016 04:16 AM2016-07-23T04:16:42+5:302016-07-23T04:16:42+5:30
कोपर्डी (ता. कर्जत) अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे याच्या पोलीस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली
अहमदनगर : कोपर्डी (ता. कर्जत) अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे याच्या पोलीस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. उर्वरित दोन आरोपींचीही सोमवारी कोठडी संपणार आहे़ सरकारी वकील सतीश पाटील यांनी आरोपीला सात दिवसांची कोठडी मिळण्याची मागणी केली़ कोपर्डी येथील घटना गंभीर असून, हे प्रकरण अतिशय संवेदनशील बनल्याने पोलिसांना सर्व बाजूने तपास करून पुरावे एकत्र करावे लागत आहेत़ घटना कुठे घडली, कशी घडली, आरोपी कुठे लपला होता या सर्व बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे़ वातावरण संवेदनशील असल्याने आरोपीला घटनास्थळासह इतर ठिकाणी घेऊन जाणे शक्य नाही़ त्यामुळे पुढील तपासासाठी आरोपीला कोठडी मिळावी, असा युक्तीवाद अॅड़ पाटील यांनी केला़ शनिवारी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले कोपर्डीत येणार आहेत़
शुक्रवारी भैय्यूजी महाराज व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी गावाला भेट दिली. भैय्यूजी महाराजांनी विद्यार्थीनींसाठी सीसीटीव्ही असलेल्या अद्ययावत दोन मिनी स्कूल बस दिल्या.
हजारे व त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. भय्यूजी महाराज संस्थान प्रणित सूर्योदय परिवारातर्फे सूर्योदय कुहू कन्याधन योजनेतून विद्यार्थिनींसाठी हजारे यांच्या हस्ते दोन बस ग्रामस्थांकडे सोपविण्यात आल्या. या मोफत बससेवेसाठी महिला वाहक असेल. (प्रतिनिधी)