राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 06:18 AM2020-02-13T06:18:24+5:302020-02-13T06:19:17+5:30
ठाकरे सरकारचे गिफ्ट : कामकाजाची वेळ वाढविली
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारच्या १८ लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांना २९ फेब्रुवारीपासून आठवड्यात पाच दिवसच काम करावे लागेल. मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत हा निर्णय घेताना रोजच्या कामकाजाची वेळ पाऊण तासाने वाढविण्याचे ठरविले.
मात्र, ज्या सरकारी कार्यालयांना कारखाना कायदा किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक आहेत, त्या कार्यालयांना व सरकारी महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार नाही.
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाºयांसोबत गेल्याच आठवड्यात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच दिवसांच्या आठवड्याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले होते आणि आता निर्णयही घेतला.
शनिवार व रविवार मिळून कर्मचाºयांना १०४ दिवस सुट्टी असेल. सार्वजनिक सुट्ट्या सुमारे २० असतात.
आतापर्यंत राज्य कर्मचाºयांना दुसºया व चवथ्या शनिवारी सुट्टी असायची, आता महिन्यातील सर्व शनिवार, रविवारी सुट्टी असेल. या निर्णयामुळे अधिकारी आणि कर्मचाºयांच्या संघटनांची एक महत्त्वाची मागणी पूर्ण झाली. आता सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याची कर्मचाºयांची मागणी आहे. केंद्र सरकार, तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, गोवा, बिहार, तमिळनाडू व पश्चिम बंगाल या राज्यांत पाच दिवसांचा आठवडा आहे. राज्यात एमएमआरडीए व एमआयडीसी कार्यालयात आधीपासूनच पाच दिवसांचा आठवडा आहे.
या निर्णयाचा फायदा कर्मचाºयांना तर होईलच, पण आठवड्यातून पाच दिवसच सरकारचे कामकाज चालणार असल्याने सरकारचा आस्थापना, तसेच वीज, पाणी, शासकीय गाड्यांचे इंधन या सर्वांवरील खर्च कमी होणार आहे.
अशी असेल कामकाजाची वेळ
या कर्मचाºयांची मुंबईत कामकाजाची वेळ सध्या सकाळी ९.४५ ते ५.३० तर अन्यत्र सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ ही आहे. आता राज्यभर सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ हीच कामकाजाची वेळ असेल. भोजनाची वेळ अर्धा तास असेल.