दोन भीषण अपघातांत पाच ठार
By Admin | Published: October 24, 2016 05:21 AM2016-10-24T05:21:42+5:302016-10-24T05:21:42+5:30
थांबलेल्या कारला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्यामुळे आणि रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव जीपने धडक दिल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात दोने भीषण अपघात झाले.
औरंगाबाद : थांबलेल्या कारला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्यामुळे आणि रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव जीपने धडक दिल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात दोने भीषण अपघात झाले. रविवारी पहाटे झालेल्या या दोन अपघातांत पाच जण जागीच ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. रविवार हा औरंगाबादसाठी ‘घात’वार ठरला.
पुण्याहून जळगावकडे जाणाऱ्या अल्टो कारचे पंक्चर चाक बदलत असताना, औरंगाबाद-अहमदनगर राज्यमार्गावर कायगावजवळील भोगे वस्तीसमोर औरंगाबादकडे जाणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कल्पेश रमेश खोडे (२७) आणि मुकेश रमेश वेलीस (२५ दोघेही रा. मुंडखेडी रोड, जळगाव) जागीच ठार झाले, तर कारमध्ये बसलेले रंजना रमेश खोडे आणि स्वरूप सुरेश सवडे हे दोघे जखमी झाले. या अपघातात कार दूर शेतात फेकली गेली. जखमींना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ट्रकचालक फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसरा अपघात औरंगाबाद- जळगाव महामार्गावरील केऱ्हाळा फाट्याजवळ झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला पाठीमागून स्कॉर्पिओने धडक दिली. त्यात स्कॉर्पिओतील विनोद रामदास इंगळे (४०, रा. जामठी, औरंगाबाद), प्रकाश अशोक जांभळे (२१, रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) व भूषण रामचंद्र मोरे (२१, रा. धुळे) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक व क्लीनर फरार झाले आहेत. (प्रतिनिधी)