डेंग्यूमुळे पाच जणांचा मृत्यू
By admin | Published: November 3, 2016 02:29 AM2016-11-03T02:29:38+5:302016-11-03T02:29:38+5:30
शहरात डेंग्यू व मलेरियाच्या साथीचे थैमान सुरू आहे. तुर्भे नाक्यावर एका महिन्यामध्ये संशयित डेंग्यूमुळे पाच जणांचा मृत्यू झाला
नामदेव मोरे,
नवी मुंबई- शहरात डेंग्यू व मलेरियाच्या साथीचे थैमान सुरू आहे. तुर्भे नाक्यावर एका महिन्यामध्ये संशयित डेंग्यूमुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
नवी मुंबईमध्ये डेंग्यू व मलेरियाची साथ आटोक्यात असल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे. पण प्रत्यक्षात शहरवासी तापाच्या साथीने हैराण झाले आहेत. तुर्भे नाका येथे प्रत्येक घरातील किमान एकतरी व्यक्ती तापाने आजारी आहे. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये पल्लवी महादेव गायकवाड, धु्रपदा रोहिदास गवळी, गीता प्रसाद, प्रेम भारत भालेकर व शंकरी हलदार यांचा समावेश आहे. एक महिन्यात पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे शाखा प्रमुख तय्यब पटेल यांनी दोन महिन्यांपासून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.पण पालिका प्रशासन लक्ष देत नाहीत. यामुळे राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. तुर्भे परिसरामधील नागरिकांसाठी महापालिकेचे रूग्णालयच नाही. तुर्भे गावातील माताबाल रूग्णालय बंद झाले आहे. यामुळे नाइलाजाने रूग्णांना वाशी प्रथम संदर्भ रूग्णालयात जावे लागत आहे. तेथे गेल्यानंतर बेड शिल्लक नसल्याचे कारण सांगून रूग्णांना मुंबईमध्ये घेवून जा असे सल्ले दिले जात आहेत. वेळेत उपचार मिळत नसल्याने रूग्णांचा मृत्यू होत आहे. पण पालिका प्रशासन जबाबदारी झटकून मृत्यू डेंग्यूमुळे नसल्याचे कारण देत जबाबदारी झटकत आहेत. परिसरामध्ये औषध फवारणीही केली जात नाही.
महापालिका प्रशासन डेंग्यू व मलेरियासाठी नागरिकांवरच दोष देत आहे. करावे गावामध्ये डेंग्यूची साथ पसरल्यानंतर नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. पण उपाययोजना करण्याऐवजी तब्बल २० नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. घरामध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. यामुळे नागरिक महापालिकेकडे तक्रार करण्याचेही टाळू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी बोनसरी गावामध्ये एक तरूणाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही तरूणाचा मृत्यू डेंग्यूमुळे झालाच नाही असा दावा करण्यात आला होता. पण याविषयी वृत्त प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशी लगेच परिसरामध्ये धूर व औषध फवारणी करण्यात आली होती. नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशीच स्थिती राहिली तर आंदोलन करावे लागेल, असा इशाराही तुर्भे परिसरातील रहिवाशांनी दिला असून यापुढे अजून कोणाचा मृत्यू झाला तर मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांवरच गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाणार आहे.
>डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्यांची नावे
पल्लवी महादेव गायकवाड
धु्रपदा रोहिदास गवळी
गीता प्रसाद
प्रेम भारत भालेकर
शंकरी हलदार
>तुर्भे नाक्यावर डेंग्यू व मलेरियाच्या साथीने थैमान घातले आहे. एका महिन्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु महापालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून अशीच स्थिती राहिली तर महापालिकेविरोधात आंदोलन करण्यात येईल.
- तैय्यब पटेल,
शाखा प्रमुख, शिवसेना