विजेच्या तडाख्याने पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 05:57 AM2019-05-23T05:57:03+5:302019-05-23T05:57:08+5:30
अवकाळीचा दणका; १०३ घरांची पडझङ, जनावरेही दगावली
सोलापूर : ऐन उन्हाळ्यात मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून तीन चिमुकली मुले, एक तरुण व ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. तसेच दहा दुभती जनावरेही दगावली. शिवाय १०३ घरांचीही पडझड झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली.
अंगावर वीज पडून दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील रोहित सुतार, अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील येथील समर्थ गगंदे, सांगोला तालुक्यातील आर्तिका देवकते या तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. सांगोला तालुक्यातील वाकी घेरडी येथील दगडू चोपडे या युवकाचा तर घेरडी येथील हौसाबाई बिचकुले यांचाही यात मृत्यू झाला .
दक्षिण सोलापूर तालुक्यात दहा घरांची पडझड झाली आहे. मोहोळ तालुक्यातील चार घरांची पडझड झालेली आहे. सांगोला तालुक्यात सर्वाधिक ६९ घरांची पडझड झाली असून मंगळवेढा तालुक्यातील ९ घरांचे पत्रे उडाले आहेत.
तेंदूपाने वेचताना महिला ठार
शेतालगतच्या जंगलात तेंदूपाने वेचताना वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. बेबी चैतू आत्राम (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. ती अहेरी तालुक्याच्या पेरमिली ग्रामपंचायती अंतर्गत आलदंडी गावातील रहिवासी होती.