किडनी प्रकरणातील पाचही डॉक्टरांना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2016 01:24 AM2016-08-19T01:24:14+5:302016-08-19T01:24:14+5:30
हिरानंदानी किडनी रॅकेट प्रकरणी अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाचही डॉक्टरांची जामिनावर सुटका केली. या पाचही डॉक्टरांनी १३ आॅगस्ट रोजी
मुंबई : हिरानंदानी किडनी रॅकेट प्रकरणी अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाचही डॉक्टरांची जामिनावर सुटका केली. या पाचही डॉक्टरांनी १३ आॅगस्ट रोजी जामिनासाठी दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता.
दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी हिरानंदानी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. सुजी चॅटर्जी, अनुराग नाईक, मुकेश शेट्टे, मुकेश शहा आणि प्रकाशचंद्र शेट्ट्ये या पाचही जणांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. गुरुवारी दंडाधिकाऱ्यांनी या सर्व डॉक्टरांची सशर्त जामिनावर सुटका केली. त्यांना २६ सप्टेंबरपर्यंत पवई पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे व देश सोडून न जाण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
‘या सर्व डॉक्टरांवर आयपीसी अंतर्गत गुन्हा नोंदवलेला नसून मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील तीन जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या डॉक्टरांची या गुन्ह्यात काहीही भूमिका नसताना त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी किडनीदान केल्याबद्दल दात्याला दिलेले पैसेही ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे या सर्व डॉक्टरांची जामिनावर सुटका करावी,’ अशी विनंती डॉक्टरांतर्फे अॅड. आबाद पौडा यांनी न्यायालयाला केली. अॅड. पौडा यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने या पाचही डॉक्टरांची जामिनावर सुटका केली.
हिरानंदानी रुग्णालयात १४ जुलै रोजी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार असून हे किडनीदाता आणि रुग्ण हे एकमेकांचे नातेवाईक नाहीत, अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी १४ जुलै रोजी ऐनवळी रुग्णालयावर धाड टाकली. ब्रिजकिशोर जैसवाल याची शस्त्रक्रिया थांबवण्यात आली. किडनी देणारी महिला त्याची पत्नी नसल्याचे निदर्शनास आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिला केवळ आर्थिक फायद्यासाठी जैसवाल याला
किडनी देण्यास तयार झाली होती. (प्रतिनिधी)